ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना दीदी यांचे निधन, पंतप्रधान मोदी यांनी वाहिली श्रद्धांजली

मुंबई,५ जून २०२३ : चित्रपट सृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना दीदी अर्थात सुलोचना लाटकर यांचे प्रदीर्घ आजाराने मुंबईत निधन झाले आहे. त्यांनी वयाच्या ९४ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. मुंबईतील शुश्रूषा हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचारु सूरू होते. मात्र उपचारा दरम्यान त्यांची प्राणज्योत माळवली होती. सुलोचना दीदी यांच्या निधनाने आता चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे.

दरम्यान सोमवारी (६ जून) प्रभादेवी येथील घरी सुलोचना दीदी यांचं पार्थिव अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. तसेच सायंकाळी पाच वाजता शिवाजी पार्क स्मशानभूमीत सुलोचना दीदी यांच्यावर शासकीय इतमामत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. सुलोचना दीदी यांच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. यावेळी शोक व्यक्त करताना, सुलोचनाजींच्या निधनामुळे भारतीय चित्रपट विश्वात एक मोठी पोकळी निर्माण झाली असल्याचे पंतप्रधान म्हणाले तर त्यांच्या अविस्मरणीय भूमिकांमुळे आपली संस्कृती समृद्ध झाली असेही त्यांनी ट्विट करत म्हटले आहे.

सुलोचना दीदी यांनी चित्रपटसृष्टीवर आजवर केलेल्या कामातून आपल्या चहात्यांच्या मनावर अधिराज्य गाजवत आपले नाव अजरामर केले आहे. त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीमधून आपल्या कामाला सुरुवात केली, तर नंतर हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये ही अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी आपली भूमिका निभावली आहे. सुलोचना दीदी यांनी आजवर हिंदी आणि मराठी भाषेत मिळून ४०० चित्रपटांमध्ये काम केले आहे.

सुलोचना दीदींच्या निधनानंतर चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. सुलोचना दीदींच्या निधनावर चित्रपट सृष्टीतील अनेक मान्यवरांनी शोक व्यक्त करून आपली श्रद्धांजली अर्पण केली आहे. त्याचबरोबर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह, राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील लोकांनीही शोक व्यक्त करत श्रद्धांजली वाहिली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी – अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा