फलटण, १३ जानेवारी २०२३ : व्यसनमुक्त युवक संघाचे मार्गदर्शक, वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ कीर्तनकार व प्रवचनकार हभप प्रकाश सदाशिव जत्रे ऊर्फ बंडातात्या कराडकर यांना सौम्य पक्षाघाताचा झटका आल्याने गुरुवारी (ता. १२) सकाळी सात वाजता त्यांना येथील ‘निकोप हॉस्पिटल’मध्ये दाखल करण्यात आले होते. उपचारानंतर त्यांची प्रकृती स्थिर होती. तथापि, काही वैद्यकीय चाचण्या करण्यात आल्या.
दरम्यान, बुधवारी (ता. १२) वडूज आणि पुणे येथील कीर्तन करताना त्यांना थोडासा त्रास जाणवला; परंतु किरकोळ औषध घेऊन त्यांनी पुण्यातच मुक्काम केला आणि सकाळी पिंप्रद (ता.फलटण) येथे पोचल्यावर त्यांची प्रकृती ठीक वाटत नसल्याने त्यांचा विरोध असतानाही तेथील अनुयायांनी त्यांना फलटण येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. ‘निकोप हॉस्पिटल’मध्ये प्रख्यात हृदयरोगतज्ज्ञ डॉक्टर जे. टी. पोळ व त्यांच्या सहकाऱ्यांनी तातडीने उपचार केले विविध वैद्यकीय तपासण्या केल्यानंतर व योग्य उपचार केल्यानंतर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत होती. त्यांना झोपही लागली होती; परंतु आज सकाळी पक्षाघाताचा तीव्र झटका आल्याने त्यांना पुढील उपचारासाठी पुणे येथे पाठविण्यात आले आहे.
‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : आनंद पवार