विभागीय आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांकडून खाजगी रुग्णालयांचा आढावा

16

पुणे, दि. १ जून २०२०: शासनाने कोविड -१९ उपचारासाठी घेतलेल्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर व जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी आज कॉन्सिल हॉल मध्ये पुणे व पिंपरी चिंचवड मधील खाजगी रुग्णालय प्रमुख व वैद्यकीय अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतली. या बैठकीत कोविड -१९च्या रुग्णांना खासगी रुग्णालयांमध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णांकडून शासनाने घालून दिलेल्या नियमांतर्गत पैसे घ्यावेत व शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे असे आवाहन विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी केले.

आज झालेल्या या बैठकीमध्ये आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉ. संजय देशमुख, उपायुक्त संजयसिंह चव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक नांदापूरकर, पुणे महानगरपालिकेचे आरोग्य विभाग प्रमुख डॉ. रामचंद्र हंकारे, भारती हॉस्पिटलच्या प्रमुख डॉ. अस्मिता जगताप यांच्यासह पुणे व पिंपरी चिंचवड मधील खाजगी रुग्णालय प्रमुख व वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.

यावेळी विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर म्हणाले, राज्य शासनाच्या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी मेस्मा, आपत्कालिन व्यवस्थापन कायदा, साथरोग नियंत्रण कायद्यांमधील तरतुदींच्या अनुषगांने खाजगी रुग्णालयांनी राज्य शासनाच्या आदेशाचे पालन करणे बंधनकारक आहे. खासगी रुग्णालयांनी शासनाच्या आदेशात निश्चित करून दिल्यानुसार दर आकारणी करावी. खाजगी रुग्णालयांनी रुग्ण सेवा चोखपणे बजवावी, तसेच कोरोना प्रतिबंधाबाबत समाजमाध्यमांमध्ये जनजागृती करावी, असे सांगून रुग्णालयांच्या अडचणी निश्चितच दूर केल्या जातील, असेही त्यांनी सांगितले.

पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरामध्ये सातत्याने वाढत असलेल्या कोविड -१९ च्या रुग्णांवर कोणताही विलंब न होता योग्य वेळेत उपचार व्हावेत, असे डॉ. म्हैसेकर म्हणाले, तसेच रुग्णालयाने देखील शासनाकडे देत असलेली माहिती ही अद्यावत असावी व सध्या स्थिती वर आधारित असावी जेणेकरून व्यवस्थापन करणे सुलभ होईल. पुणे व पिंपरी-चिंचवड शहरामध्ये पॉझिटिव्ह सापडलेल्या प्रत्येक रुग्णावर उपचार होणे गरजेचे आहे, तसेच ती आपली जबाबदारी देखील आहे आणि ही जबाबदारी आपण तत्परतेने पार पाडली पाहिजे, असा विश्वासही डॉ. म्हैसेकर यांनी व्यक्त केला.

कोरोना उपचार करणा-या हॉस्पिटलचे व्यवस्थापन, रुग्णवाहिका व अन्य वैद्यकीय सुविधांचे व्यवस्थापन व इतर आवश्यक माहिती अद्ययावत ठेवण्यासाठी तयार केलेल्या कोविड केयर सॉफ्टवेअरबाबत डॉ. म्हैसेकर यांनी माहिती दिली.

बैठकीत पुणे जिल्ह्यातील कोरोना रुग्ण, उपचार करण्यात आलेले रुग्ण, हॉस्पिटलमधील सोयी-सुविधा, रुग्णवाहिका व्यवस्था, अधिक रुग्ण असलेली क्षेत्रे, रुग्णांचे समुपदेशन, मृत्यू दर कमी करण्यासाठी उपाययोजना, डॉक्टरांना आवश्यक सोयी-सुविधा, पीपीई किट, सॅनिटायझर आदी वैद्यकीय साधनसामग्रीची उपलब्धता, उपलब्ध आणि आवश्यक डॉक्टर व परीचारकांची संख्या अशा विविध बाबींचा डॉ. म्हैसेकर व श्री. राम यांनी आढावा घेतला.

न्यूज अनकट प्रतिनिधी