नाशिक मध्ये विधानसभा उपाध्यक्ष थेट मिनी मंत्रालयात

नाशिक, २० मे २०२३: जिल्हा ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या विषयात काही सूचना करण्यासाठी विधानसभेचे उपाध्यक्ष तथा दिंडोरी पेठ विधानसभा मतदारसंघाचे सदस्य नरहरी झिरवाळ थेट जिल्हा परिषदेत दाखल झाले. यावेळी त्यांच्या सोबत त्र्यंबक-इगतपूरी विधानसभा मतदारसंघाचे सदस्य हिरामण खोसकर देखील होते.

यावेळी आमदार झिरवाळ यांनी कार्यकारी अभियंता बांधकाम १ आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांच्या दालनात बैठक घेत पाणीपुरवठा योजनेच्या कामांबाबत नाराजी व्यक्त केली. याबाबत अधिकाऱ्यांना सूचना देत यातून कसा मार्ग काढता येईल यांचे मार्गदर्शन देखील केले. याबाबत सीईओ मित्तल यांना विचारले असता त्यांनी आमदारांचे काही प्रश्न असल्याने त्यांनी आज भेट दिली असल्याचे सांगितले.

विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ आणि आमदार हिरामण खोसकर यांनी जिल्हा परिषदेत येऊन ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे प्रभारी कार्यकारी अभियंता संदीप सोनावणे यांची हजेरी घेतली. जलजीवन मिशन योजनांच्या कामांसह बांधकाम विभागाकडून झालेल्या काम वाटपावरून सोनावणे यांची कानउघडणी केली.

न्यूज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा