विधानपरिषदेची जागा रिक्त; या नेत्याला मिळणार संधी

मुंबई : विधान परिषद सदस्य धनंजय मुंडे विधानसभेवर निवडून गेल्याने रिक्त झालेल्या या जागेसाठी २४ जानेवारीला मतदान होईल. निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या वर्षी १० ऑक्टोबरला धनंजय मुंडे यांचा विधानसभा निवडणुकीत विजय झाल्यामुळे विधानपरिषदेची एक जागा रिक्त झाली आहे. या जागेवर २४ जानेवारीला मतदान होणार आहे. विधानपरिषदेचे सदस्य म्हणून मुंडेंचा कार्यकाळ ७ जुलै २०२२ पर्यंत होता.

धनंजय मुंडेंच्या रिक्त जागेसाठी निवडणूक घोषित झाली असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उमेदवारी स्वीकारणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. सध्या उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असून त्यांना महाराष्ट्र विधिमंडळाच्या कोणत्याही एका सभागृहाचे सदस्य असणे बंधनकारक आहे. अशात ते विधानसभेवर निवडून आले नसल्याने त्यांना विधानपरिषदेवर आमदार होणे आवश्यक असून ते धनंजय मुंडे यांच्या जागी उमेदवारी स्वीकारणार असल्याची चर्चा सध्या सुरु आहे.

आयोगाने जाहीर केलेल्या निवडणुक वेळापत्रकानुसार १४ जानेवारी रोजी उमेदवारी अर्ज भरण्यास सुरवात होईल. १५ जानेवारी रोजी उमेदवारी अर्जांची तपासणी करण्यात येईल. तर १७ जानेवारीला उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख असेल.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा