इंदापूर, दि.२ मे २०२०: विधानपरिषदेच्या रिक्त झालेल्या जागांमध्ये माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांना भारतीय जनता पक्ष संधी देऊन बारामतीच्या पवारांच्या हक्काच्या लोकसभा मतदारसंघात आपले दमदार अस्तित्व निर्माण करणार का? यावर उलट- सुलट चर्चांना तालुक्यात उधाण आले आहे.
जर हर्षवर्धन पाटलांना विधानपरिषदेवर संधी दिली गेली नाही तर बारामती लोकसभा मतदारसंघात प्रत्येक निवडणुकीला नुसती शोधाशोध करावी लागेल अशीही चर्चा रंगली आहे. माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी काँग्रेसच्या पहिल्या फळीतील बाक सोडून भाजपमध्ये प्रवेश केला. यामध्ये केंद्रात असणारी भाजपची सत्ता व राज्यात असणारी भाजपची सत्ता कारणीभूत होती. मात्र विधानसभेचा निकाल हाती आल्यानंतर संख्याबळ असताना देखील भाजपला मुख्यमंत्रिपदाची खुर्ची टिकवता आली नाही. त्यामुळे काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसमधून गेलेले मातब्बर नेते भाजपमध्ये एकाकी पडले. तसे पाहिले तर पश्चिम महाराष्ट्रात माजी मंत्री हर्षवर्धन पाटील सहकार चळवळीतील वरिष्ठ नेते आहेत. भाजपने माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांना शब्द देऊन देखील, कोणतीही वरिष्ठ जबाबदारी हर्षवर्धन पाटलांवर अध्याप दिलेली नाही.
जरी इंदापूर पंचायत समिती व दोन साखर कारखाने हर्षवर्धन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली चालत असले, तरी देखील स्थानिक पातळीवरील चित्र राष्ट्रवादी काँग्रेसमय झाले आहे. बारामती, दौंड, इंदापूर या परिसरात हर्षवर्धन पाटील यांचा दांडगा कामाचा संपर्क असल्यामुळे भाजपला आगामी काळात या तीन तालुक्यांमध्ये चांगले दिवस येणार आहेत.
मात्र विधानपरिषदेचे आमदारकीची जागा हर्षवर्धन पाटील यांना देण्यात यावी, अशी मागणी हर्षवर्धन पाटील समर्थकांनी लावून धरलेली दिसत आहे.
न्युज अनकट प्रतिनिधी: योगेश कणसे