पुणे, २४ सप्टेंबर २०२०: पुण्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड यांचं काही महिन्यांपूर्वी निधन झालं होतं. त्यामुळं त्यांच्या जागी कोण येणार याची सर्वत्र चर्चा रंगली होती. मात्र, अखेर आता हा तिढा संपला आहे. विजय देशमुख यांची पुण्याच्या अतिरिक्त जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आलीय. काल रात्री (२३ सप्टेंबर) उशिरा त्यांनी आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला.
विजय देशमुख हे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या मर्जीतील अधिकारी असल्याचं बोललं जातं आहे. साहेबराव गायकवाड यांचं निधन झाल्यानंतर हे पद अनेक महिन्यांपासून रिक्त होतं. या पदासाठी अनेक अधिकार्यांमध्ये चढाओढ देखील लागली होती. यात अजित पवारांच्या मर्जीतील विजय देशमुख, सिडकोतील ठाणे विभागाचे अतिरिक्त भूमी व भूमापन अधिकारी अजिंक्य पडवळ, पुण्यातील माजी निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र मुठे ही नावं चर्चेत होती. यातील अजिंक्य पडवळ हे कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या मर्जीतील मानले जातात. त्यामुळं या पदावर नेमकं कोणाची नियुक्ती होणार याकडे सर्वांचे लक्ष लागलं होतं.
कोण आहेत विजय देशमुख
देशमुख यांना पुणे जिल्ह्यात काम करण्याचा अनुभव आहे. यापूर्वी देखील त्यांनी या पदावर काम पाहिलं आहे. मात्र, काही न्यायालयीन प्रक्रियमुळं त्यांना या पदावर राहता आलं नव्हतं. विजय देशमुख हे सध्या पुण्यात कुळकायदा शाखेत उपजिल्हाधिकारी म्हणून कार्यरत होते.
न्यूज अनकट प्रतिनिधी