विजय माल्ल्या वर आली बिकट स्थिती, वकिलांची फी देण्यास नाही पैसे

लंडन, १३ डिसेंबर २०२०: भारताचा फरार उद्योगपती विजय माल्ल्या यांच्याकडं लंडनमध्ये पैशांची कमतरता भासू लागली आहे. भारतात ऐशोआरामात जीवन जगणाऱ्या आणि कोट्यवधी रुपयांचे मालक असलेल्या माल्ल्या यांना लंडनमध्ये अगदी हजारो आणि लाखो रुपयांचा लेखाजोखा ठेवावा लागत आहे. इतकंच काय तर विजय माल्ल्या यांची परिस्थिती अशी आहे की, त्याच्याकडं वकिलांना फी देण्याइतपत देखील पैसे उरलेले नाहीत. या बरोबरच त्यांचा वैयक्तिक खर्च पूर्णपणे खंडित झाला आहे.

भारताच्या तपास यंत्रणांच्या अडचणींचा सामना करत विजय माल्ल्या यांनी लंडन हायकोर्टाला फ्रेंच मालमत्ता विक्रीतून मिळालेल्या पैशांपैकी १४ कोटी रुपये सोडण्यास सांगितलं आहे.

वेळ इथवर आली आहे की, लंडनमध्ये विजय माल्या यांचा खटला लढविणार्‍या वकिलानं असं म्हटलं आहे की, जर त्यांची फी मिळाली नाही तर पुढील सुनावणी पासून ते हा खटला सोडून देतील. लंडन कोर्टानं विजय मल्ल्या यांची मालमत्ता त्यांच्या देखरेखीखाली ठेवली आहे. माल्ल्या या मालमत्तांची विक्री करू शकत नाही किंवा त्यांच्यावर कर्ज घेऊ शकत नाही.

लंडन कोर्टानं विजय माल्ल्या यांची अवस्था पाहता दया दाखविली आहे. विजय माल्ल्या यांच्या खर्चासाठी, फी भरण्यासाठी ३९ लाख रुपये देण्याचे न्यायालयानं मान्य केलं आहे. परंतु, कोर्टानं त्यांच्या वैयक्तिक खर्चासाठी एक पैसाही सोडलेला नाही. आता या प्रकरणाची सुनावणी पुढील शुक्रवारी होईल.

विजय माल्ल्याविरूद्ध फक्त लंडनच नव्हे तर भारतातही अनेक खटले सुरू आहेत. या प्रकरणांमध्ये त्यांना भरपूर पैसे खर्च करावे लागतील.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा