महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या सरचिटणीस पदी विजयसिंह चौधरी…

20

इंदापूर, २९ डिसेंबर २०२०: इंदापूर चे सुपुत्र महाराष्ट्र प्रदेश विद्यार्थी काँग्रेसचे माजी अध्यक्ष ऍड. विजयसिंह चौधरी यांची महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या सरचिटणीस पदी निवड झाली आहे. इंदापूर येथील सर्वसामान्य कुटुंबातून त्यांनी विद्यार्थि असताना आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली होती. विविध सामाजिक क्षेत्रात त्यांचा सक्रिय सहभाग असतो.

महाराष्ट्र प्रदेश विद्यार्थी काँग्रेस अध्यक्ष पदाला गवसणी घालणारे इंदापूर तालुक्यातील ते एकमेव आहेत. राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांचे निकटवर्तीय असणारे चौधरी यांना नुकतीच युवक काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस पदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. थेट पक्षाध्यक्ष यांच्या सहीने चौधरी यांना त्यांच्या नियुक्तीचे पत्र प्रदान करण्यात आले आहे.

इंदापूर तालुक्यासह पुणे शहर मध्ये त्यांनी युवक काँग्रेसची मोर्चेबांधणी केली आहे. नुकत्याच झालेल्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी त्यांनी भरीव योगदान दिले आहे. पक्षश्रेष्ठी नेहमीच निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभे असल्याचे मत नवनिर्वाचित प्रदेश सरचिटणीस विजयसिंह चौधरी यांनी न्यूज अनकटशी बोलताना व्यक्त केले आहे. चौधरी यांच्या निवडीमुळे विविध क्षेत्रातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल कणसे