चांद्रयान-३ मिशनमध्ये कुठलीही तांत्रिक अडचण आली तरीही चंद्रावर सॉफ्ट लँडिंगसाठी विक्रम लँडर सक्षम, इस्रोचे अध्यक्ष एस.सोमनाथ यांची माहिती

नवी दिल्ली, ९ ऑगस्ट २०२३ : सध्या भारताची तिसरी चांद्र मोहिम सुरु आहे. येत्या २३ ऑगस्टला चंद्रावर सॉफ्ट लँडिंगचे लक्ष्य आहे. चांद्रयान-३ सध्या चंद्राच्या कक्षेत भ्रमण करत असुन चांद्रयान-३ मध्ये सेंसर आणि दोन इंजिन आहेत. यानातील इंजिन फेल झाले तरी चांद्रयान-३ चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करण्यात सक्षम असेल. अशी माहिती भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्रोचे अध्यक्ष एस.सोमनाथ यांनी मंगळवारी ही दिली.

दिशा या संस्थेने अवकाश विषयासंदर्भात एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी बोलताना सोमनाथ यांनी ही माहिती दिली. ऐन मोक्याच्या क्षणी काही गोष्टी फसल्यास त्या हातळण्याच्या दृष्टीने विक्रम लँडरचे डिझाइन बनवण्यात आले आहे. अचानक काही बिघाड झाला, सगळे सेंसर फेल झाले, काहीच काम करत नसेल, तरीही विक्रम लँडर लँडिंग करेल. अशा पद्धतीने लँडरच डिझाइन बनवण्यात आले आहे, फक्त प्रोप्लशन सिस्टिमने व्यवस्थित काम केले पाहिजे असे सोमनाथ म्हणाले.

चांद्रयान-३ हे १४ जुलै रोजी श्रीहरिकोटा येथून अवकाशाच्या दिशेने झेपावले होते. यानाने ५ ऑगस्टला चंद्राच्या कक्षेत प्रवेश केला. यानाला चंद्राच्या जवळ नेण्यासाठी त्यावर आणखी तीन डी-ऑर्बिटिंगच्या प्रोसेस होतील. २३ ऑगस्टला चंद्रावर सॉफ्ट लँडिंगची योजना आहे. डी-ऑर्बिटिंगची प्रोसेस ९, १४ आणि १६ ऑगस्टला होईल.

लँडर प्रोप्लशन सिस्टिमपासून वेगळा झाल्यानंतर चंद्रावर सुरक्षित लँडिंगसाठी त्याला वर्टिकल केले जाईल. हे महत्त्वपूर्ण आहे. चांद्रयान-२ मिशनमध्ये इस्रोला चंद्रावर सॉफ्ट लँडिंगमध्ये अपयश आले होते. लँडरला हॉरिझाँटल ते वर्टिकलमध्ये आणण्याचे मॅन्यूव्हर महत्त्वाच असेल. मागच्यावेळी हीच अडचण आली होती. त्यामुळे मिशन फसले होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी : अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा