पुरंदर तालुक्यातील नीरा येथील रेल्वेच्या कामावर ग्रामस्थांचा आक्षेप

पुरंदर, पुणे २ डिसेंबर २०२३ : नीरा ता.पुरंदर येथे रेल्वे प्रशासनाच्यावतीने रेल्वे स्थानकाच्या पश्चिमेला आणखी ट्रॅक वाढवण्याचे काम.सुरू करण्यात आले आहे. मात्र या कामाबाबत नीरा येथील ग्रामस्थांनी आक्षेप घेतला असून आधी रेल्वे आणि आमची जागा मोजून निश्चित करा. तुमची किती जागा आहे? त्याचे पुरावे सादर करा आणि लोकांशी चर्चा करून मगच काम सुरू करा. अशी मागणी नीरा येथील ग्रामस्थांनी केली आहे. काम बंद न केल्यास आंदोलनाचा इशारा ग्रामस्थांच्यावतीने देण्यात आला आहे.

नीरा रेल्वे स्टेशनच्या वाढीव कामात रेल्वे प्रशासन खाजगी जागेत अतिक्रमण करत असून रेल्वेने एकतर्फी मोजणी करून ज्या लोकांकडे स्वतःचे सातबारा उतारा आणि ‘ क ‘ पत्रक आहे अशा लोकांच्या जागेत नंबर टाकून स्वतःची एकतर्फी हद्द निश्चित करून काम सुरू केले आहे. हे अन्यायकारक असून रेल्वे प्रशासनाने लोकांशी चर्चा करून रीतसर शासकीय मोजणी करून मगच काम सुरू करावे अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. आज (शुक्रवारी) रेल्वेचे इंजिनिअरिंग विभागाचे अधिकारी कुलकर्णी हे लोकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आले होते.यावेळी लोकांनी ही मागणी केली आहे.

यावेळी नीरा ग्रामपंचायतीचे सरपंच राजेश काकडे, जिल्हा परिषदेचे माजी सभापती दत्ता चव्हाण, अनिल चव्हाण, अण्णा माने, सचिन मोरे, दादा गायकवाड व मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. रेल्वेच्या वाढीव कामामुळे स्टेशन मस्जिद मध्ये जाणाऱ्या लोकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.त्यामुळे या ठिकाणी जाण्यासाठी रस्ता करून देण्याची मागणी यावेळी करण्यात आली. तर अण्णा माने यांनी पूर्वीचा नीरा ते नावचाडोह हा रस्ता रेल्वे मुळे अडवला गेला असून तो पूर्ववत करून देण्याची तसेच अंडरपास पुल बांधला जावा अशी मागणी देखील त्यांनी केली.

या विषयावर खासदार सुप्रिया सुळे यांनी दिनांक ५ डिसेंबर रोजी पुणे येथे ग्रामस्थ आणि रेल्वेचे अधिकारी यांच्या दरम्यान बैठकीचे आयोजन केले आहे. खा.सुप्रिया सुळे देखील या बैठकीला हजर रहाणार आहेत. यावेळी यातून मार्ग काढला जाईल अशी माहिती जिल्हा परिषदेचे माजी सदस्य विराज काकडे यांनी दिली आहे. लोकांच्या समस्या जाणून घेऊन या ठिकाणी पर्यायी मार्ग काढावा लोकांचे नुकसान होणार नाही अशा सूचना सुळे यांनी दिल्या असल्याचे काकडे म्हणाले.

न्युज अनकट प्रतिनिधी : राहुल शिंदे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा