इंदापूर तालुक्यात मंत्र्यांकडून सोशल डिस्टंन्सिंगचे उल्लंघन : नानासाहेब शेंडे

इंदापूर, दि.४ मे २०२०: राज्य मंत्री मंडळातील राज्यमंत्री दत्तात्रय भरणे हे गेली अनेक दिवसांपासून इंदापूर तालुक्यामध्ये जीवनावश्यक वस्तूंचे किट वाटप करताना गर्दी जमवून सोशल डिस्टंन्सिंगचे व लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन करीत आहे.

कोरोना व्हायरसचा संसर्ग टाळण्यासाठी लॉकडाऊन असताना संचारबंदी व सोशल डिस्टंन्सिंगचे नियम हे शासनाचे मंत्री पाळत नसणे हि गंभीर बाब आहे, याची दखल तातडीने प्रशासनाने घ्यावी,अशी मागणी इंदापूर तालुका भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष नानासाहेब शेंडे यांनी आज (दि.४) रोजी केली.

यावेळी भरणे म्हणाले की, इंदापूर तालुक्यात भिगवण येथील एका व्यक्तीला कोरोना व्हायरसचा संसर्ग होऊन नुकताच मृत्य झाला आहे. अशा प्रकारे इंदापूर तालुक्यात कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या चिंतेची परिस्थिती असताना खुद्द राज्याचे मंत्रीच सरकारी नियमांना पायदळी तुडवीत आहेत. मंत्री हे नियमबाह्य रीतीने गर्दीमध्ये किट वाटत असल्याने या गर्दीत एखादी जरी कोरोणाग्रस्त व्यक्ती दुर्दैवाने इतरांच्या संपर्कात आल्यास त्याचा किती गंभीर परिणाम सामान्य जनतेवर होऊ शकतो, याची जाणीव त्यांनी ठेवणे अतिशय गरजेचे आहे.

जनतेला जीवनावश्यक वस्तूंचे किट वाटप हे इतरांनी वाटप केले किंवा घरपोच ही करता येते. फक्त स्वतःला प्रसिद्धी मिळवण्याच्या हेतूने हे सर्व केले जात असल्याचा आरोप तालुकाध्यक्ष नानासाहेब शेंडे यांनी केला.
आज सोमवारी बावडा, वकीलवस्ती, लुमेवाडी येथे सोशल डिस्टंन्सिंगचे उल्लंघन करीत मंत्री भरणे यांनी किटचे वाटप केले. बावडा गावामध्ये तर किटचे वाटप करत असताना सर्वांना किट न मिळाल्याने गर्दी पांगवण्यासाठी जनतेवर पोलिसांना बळाचा वापर करावा लागला, असे त्यानी सांगितले.

राज्यमंत्री भरणे हे सध्या लॉकडाऊन व संचारबंदीचे सर्व नियम धाब्यावर बसवून, स्वतःला प्रसिद्धी व राजकीय लाभ मिळविण्यासाठी तालुक्यामध्ये जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप करीत आहेत. हे करताना जनतेला कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका निर्माण होत आहे, याची काळजी ते जबाबदार मंत्री म्हणून का घेत नाहीत. मंत्री भरणे यांच्या उपस्थितीत होणाऱ्या बेकायदेशीर गर्दीकडे व संचारबंदी नियमांच्या उल्लंघनाकडे प्रशासनाने लक्ष द्यावे, अशी मागणीही भाजप तालुकाध्यक्ष नानासाहेब शेंडे यांनी केली आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी: योगेश कणसे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा