कोरोनाबाबतच्या उपाययोजनेचे उल्लंघन करणाऱ्यांवर होणार दंडात्मक कारवाई. – जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर.

सोलापूर, ३ ऑगस्ट २०२०: सोलापूर जिल्ह्यात कोरोनामुळे अतिशय गंभीर परिस्थिती निर्माण झालेली आहे. रूग्णाच्या संख्येत दिवसेंदिवस वाढच होत जात आहे. तरी, यावर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासन अतोनात प्रयत्न करत आहेत. सद्यस्थितीकडे लक्ष देता जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी कोरोनाच्या उपाययोजनेचे जे कोणी उल्लंघन करेल त्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे आदेश जारी केलेले आहेत.

नागरिकांनी आपल्या चेहऱ्यावर मास्क रुमालचा वापर करणे हे बंधनकारक आहे. सार्वजनिक तसेच कामाच्या ठिकाणी, प्रवासामध्ये सुरक्षित अंतर ठेवावे. स्वच्छतेचे पालन करणे आवश्यक असून नाक, कान डोळे यांना स्पर्श होणार नाही याची काळजी घ्यावी. तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थाचे सेवन करून सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये, तसेच या पदार्थांचे विक्री करणारे दुकान आणि पानटपऱ्या बंद ठेवण्यात याव्यात. अत्यावश्यक परिस्थितीमध्ये दुचाकी वर दोघेजण हेल्मेट व मास्कसह, तीन चाकी वाहनात चालक आणि इतर दोन प्रवासी, चार चाकी वाहनात चालक व इतर ३ प्रवासी तर टॅक्सी, कॅब, अॅग्रीगेटर चालक व इतर तिघांना परवानगी असेल, अशा बाबी आदेशात नमूद करण्यात आलेल्या आहेत.

संबंधित आदेशांचे उल्लंघन केले तर, साथ रोग प्रतिबंधात्मक कायदा १८९७ व आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. तालुकास्तरावर तहसीलदार, नायब तहसीलदार, मंडल अधिकारी, पोलीस प्रशासन, गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी (आरोग्य), नगरपालिका मुख्याधिकारी, स्वच्छता निरीक्षक, तलाठी, ग्रामसेवक, यांनी कोवीड उपाय योजना नियम २०२० अन्वये दंडात्मक कारवाई करावी, असे देखील जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी संबंधित आदेशात नमूद केलेले आहे.

न्यूजअनकट प्रतिनिधी – प्रगती कराड.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा