मणिपूरमध्ये मंगळवारी पुन्हा हिंसाचार, गोळीबारात ९ ठार तर १० जण जखमी

मणिपूर १४ जून २०२३: मणिपूरमध्ये काल पुन्हा एकदा हिंसाचार उफाळून आला. कांगपोकपी जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या अजीगंज गावात मंगळवारी रात्री १० ते १०.३० च्या दरम्यान गोळीबार झाला. या हिंसाचारात ९ जणांचा मृत्यू झाला आहे, तर १० जण जखमी झाले आहेत. सशस्त्र हल्लेखोरांच्या एका गटाने हा हिंसाचार केला अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. हिंसाचारामुळे जीवाच्या भीतीने मणिपूरमध्ये मोठ्या प्रमाणात लोक बेघर झाले आहेत.

अजीगंज घटनेतील सर्व जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यापैकी एकाची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. ज्या ठिकाणी हिंसाचार झाला आहे त्या ठिकाणच्या सुरक्षेची जबाबदारी आसाम रायफल्सवर असल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्याने दिली. सध्या या हिंसाचारग्रस्त भागातील परिस्थिती नियंत्रणात आहे.

दरम्यान, मणिपूरमधील हिंसाचारात आतापर्यंत ११५ लोकांचा मृत्यू झाला आहे, तर तब्बल ४० हजार लोक बेघर झाले आहेत. हिंसाचारावर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांसोबतच लष्कर आणि आसाम रायफल्सचे जवानही तेथे तैनात आहेत. त्यामुळे काही प्रमाणात हिंसाचार आटोक्यात आणण्यातही यश आले आहे. १ जून रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी तणाव कमी करण्यासाठी आणि राज्यात शांतता प्रस्थापित करण्यासाठी शांतता समिती स्थापन करण्याची घोषणा केली होती. परंतु सोमवारी, मैतई आणि कुकी समुदायातील प्रमुख नागरी संस्थांनी शांतता समितीचा भाग होण्यास नकार दिलाय.

न्यूज अनकट प्रतिनिधी- सूरज गायकवाड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा