माढा, दि. २४ जुलै २०२०: माढा तालुक्यातील बेंबळे येथे मंदिर परिसरात शौचालय बांधण्याच्या वादातून दोन गटात तलवार, कोयता, लोखंडी रॉड, पाईप, काठ्या यासह प्राणघातक हत्यारानीशी दोन गटात तुफान हाणामारी होऊन दोन्ही गटातील मिळून माजी सरपंच कैलास भोसले सह दहाजण जखमी झाले असून २३ जणांवर टेंभुर्णी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना गुरुवारी सकाळी १० ते १०.३० वा.सुमारास घडली असून गावात तणावपूर्ण शांतता आहे.
याबाबत टेंभुर्णी पोलीस ठाण्यातून मिळालेली अधिक माहिती अशी की, बेंबळे गावात जोतिबा मंदिर ट्रस्ट असून या ट्रस्टसाठी ग्रामपंचायतीने जागा दिलेली होती. या जागेतच तालमीचे बांधकाम ही सुरू होते. त्याच मंदिराच्या आवारात शौचालयाचे काम करण्याचे नियोजन होते. यास गावातील काही लोकांचा विरोध होता. यावरून दोन गटात वाद सुरू होते. याबाबत पंचायत समितीस निवेदन ही देण्यात आले होते. घटनेदिवशी गुरुवारी सकाळी गटविकास अधिकारी हे या ठिकाणी भेट देण्यास येणार अशी कुणकुण लागल्याने येथे जमाव जमा झाला. यानंतर दोन गटात तलवार, कोयता, लोखंडी रॉड, लाकडी दांडक्यांनी तुफान हाणामारी झाली.
याबाबत कैलास पांडुरंग भोसले (वय-४०) रा.बेंबळे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गावातील ज्योतिबा ट्रस्टचे पदाधिकारी, ज्योतीराम नागटिळक व त्याच्यासोबत एकनाथ दगडू भोसले, सदाशिव बबन भोसले, सहदेव विश्वनाथ पवार, बापू छगन भोसले, आदिनाथ नवनाथ ठोंबरे, नवनाथ गणपत हुंबे, रोहित वागदरे, आबा गणगे संदीप कदम, किशोर कदम, सोमनाथ नागटिळक व गावातील इतर लोकं ज्योतिबा मंदिराच्या आवारात शौचालयाचे बांधकाम करावयाचे म्हणून गावातील रस्त्यावर उभे राहून हातात तलवारी, लोखंडी गज,लाकडी दांडे घेऊन फिरत आहेत असे चुलते बिभिषण भोसले यांनी फोनवरून कळवल्याने मी त्यांना समजून सांगण्याकरता गावात गेलो असता, त्यावेळी ज्योतिबा मंदिराच्या दरवाजासमोर रोडवर मंदिराचे ट्रस्टी आगतराव लोंढे, नामदेव भोजने,कृष्णदेव पवार व गावातील इतर लोक होते.त्यांच्याजवळ जाऊन मी न्यायालयात दावा दाखल केला असून तुम्ही न्यायालयाचा निकाल लागल्यानंतर त्याप्रमाणे बांधकाम करा असे समजावून सांगत असताना ज्योतीराम नागटिळक यांनी माझे अंगावर येऊन आम्ही आज पासून तालमीमध्ये शौचालयाचे बांधकाम करणार आहे.आम्हाला कोण आडवितो त्याला जिवंत ठेवणार नाही असे म्हणत त्याने त्यांच्या हातातील तलवार माझ्या हातावर मारली.तेव्हा मी त्याचा वार चुकविला.दरम्यान माझ्या हातात रोडवर पडलेला लोखंडी रॉड आला.त्याने पुन्हा माझे डोक्यात तलवारीने मारले तेव्हा मी लोखंडी रॉडने तो वार अडविला.परंतु लोखंडी रॉड माझ्या हातातून सुटला. तेवढ्यात बाजूला उभ्या असलेल्या सदाशिव भोसले याने त्याच्या हातातील तलवार माझ्या डोक्यात मारली.त्याचा वार डोक्यात झाल्याने मी खाली पडलो.तेव्हा सोमनाथ नागटिळक याने त्याच्या हातातील लोखंडी रॉडने मला पाठीवर,हातावर पायावर मारले.माझा मित्र उत्तम काळे हा मला वाचविण्यास आला असता त्याला बापू भोसले याने डोक्यात तलवारीने वार केला.भांडण चालू असताना तेथे पप्पू काळे आला त्यालाही आबा गणगे याने हातातील लाकडी दांडक्याने मारहाण केली.माझ्या डोक्यातून रक्तस्त्राव होऊ लागल्याने मला सोडवण्याकरिता विजय शिवाजी पवार,दादा बिभीषण भोसले,भाऊ विलास भोसले आले असता त्यांनाही वरील लोकांनी हाताने,लाकडी दांडक्याने, रॉडने मारहाण केली.त्यानंतर मला उत्तम काळे,विजय पवार,अमोल पवार,दादा भोसले यांनी गावातील गाडीमधून टेंभुर्णी पोलीस ठाणे येथे घेऊन गेले अशा आशयाची फिर्याद दिली आहे.अधिक तपास सपोनि भोसले हे करीत आहेत.
तर विरोधी गटाच्या ज्योतीराम नागटिळक (वय-३५) यांनी दिलेल्या फिर्यादीत पप्पू बळीराम काळे,बबलू काळे,नागनाथ भोजने,सोमनाथ नामदेव भोजने,दादा उर्फ उत्तम काळे,दादा बिभिषण भोसले,विजय शिवाजी पवार,अतुल महादेव अनपट, बळीराम ज्ञानदेव भोजने व औदुंबर लोंढे सर्व रा.बेंबळे यांच्या विरोधात फिर्याद दिली असून मी गटविकास अधिकारी कुर्डूवाडी हे मंदिराची पाहणी करण्यासाठी गावात येणार असल्याचे समजल्याने तेथे गेलो असता तुम्ही येथे का बसलात असे म्हणून बळीराम भोजने याने त्याच्या हातातील लोखंडी पाईपने माझे डाव्या हातावर, पायावर व पाठीत मारून जखमी केले,पप्पू काळेने त्याच्या हातातील कोयत्याने प्रवीण मिस्कीन यांच्या डोक्यात,नागनाथ गोरडे यांनी त्याच्या हातातील कोयत्याने सदाशिव भोसले यांच्या डोक्यात मारून गंभीर जखमी केले व इतर लोकांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ,दमदाटी केली अशा आशयाची फिर्याद दाखल केली आहे.या घटनेचा सपोनि अमित शितोळे हे तपास करीत आहेत.
या घटनेत पोलिसांनी मोठ्या प्रमाणात घातक शस्त्रे,मोटारसायकली जप्त केल्या आहेत.
न्यूज अनकट प्रतिनिधी: प्रदीप पाटील