लंडन, १९ सप्टेंबर २०२२: ब्रिटनची राणी एलिझाबेथ द्वितीय यांच्यावर आज शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. राणीच्या अंत्यसंस्कारासाठी जगभरातील सुमारे ५०० प्रतिनिधी आणि व्हीआयपी उपस्थित राहणार आहेत. लंडनमधील वेस्टमिन्स्टर अॅबे येथे राणीच्या अंत्यसंस्काराला सुरुवात होणार आहे. त्याचे थेट प्रक्षेपण होणार आहे. त्यासाठी विविध उद्यानांमध्ये मोठे स्क्रीन लावण्यात आले आहेत. राणीच्या अंतिम निरोपाची तयारी जोरात सुरू आहे. राणी एलिझाबेथ द्वितीय यांचे वयाच्या ९६ व्या वर्षी ८ सप्टेंबर रोजी स्कॉटलंडमधील बालमोरल कॅसल येथे निधन झाले.
मिळालेल्या माहितीनुसार, महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांची शवपेटी आज सकाळी १०.४४ वाजता वेस्टमिन्स्टर पॅलेसमधून वेस्टमिन्स्टर अॅबे येथे नेण्यात येणार आहे. त्यानंतर सकाळी ११ वाजता वेस्टमिन्स्टर अॅबे येथे राणीच्या अंत्यसंस्काराचे विधी केले जातील. यानंतर सकाळी ११.५५ च्या सुमारास २ मिनिटांचे मौन पाळण्यात येईल.
प्रिन्स फिलिप यांच्या शेजारी दफन केले जाईल
यानंतर दुपारी १२.१५ वाजता सार्वजनिक फेरी काढण्यात येईल. राणीची शाही शवपेटी लंडनमधील वेस्टमिन्स्टर अॅबे येथून वेलिंग्टन आर्क येथे हलवली जाईल. ही शवयात्रा ब्रॉड सॅन्क्चुरी, पार्लमेंट स्क्वेअर, व्हाईटहॉल, हॉर्स गार्ड्स परेड, हॉर्स गार्ड्स रोड, द मॉल आणि कॉन्स्टिट्यूशन हिल या मार्गावरून जाईल. राणी एलिझाबेथ द्वितीय यांची शवपेटी अल्बर्ट मेमोरियलमध्ये नेली जाईल. यानंतर विंडसरचा प्रवास सुरू होईल. सोमवारी संध्याकाळी, दिवंगत राणीला त्यांच्या दिवंगत पती प्रिन्स फिलिप यांच्यासमवेत किंग जॉर्ज सहावा मेमोरियल चॅपल येथे राज्य सन्मान आणि शाही समारंभांसह दफन केले जाईल.
सिनेमागृहांमध्येही थेट प्रक्षेपण होणार
संस्कृती, मीडिया आणि क्रीडा विभाग (DCMS) ने सांगितले की, लंडनच्या हाइड पार्क, शेफिल्डचा कॅथेड्रल स्क्वेअर, बर्मिंगहॅमचा सेन्टेनरी स्क्वेअर, कार्लिस्लेचा बाइट्स पार्क, एडिनबर्गचा होलीरूड पार्क आणि उत्तर आयर्लंडमधील कोलेरेन टाऊन हॉलसह देशभरात मोठ्या स्क्रीन्स बसवण्यात येणार आहेत. तसेच सोमवारी संपूर्ण यूकेमध्ये सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. ब्रिटनमधील सिनेमागृहेही अंत्यदर्शनासाठी तयारी करत आहेत.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे