पुणे, १२ सप्टेंबर २०२३: भारतीय फलंदाज विराट कोहलीने नवा विक्रम रचला आहे. कोहलीने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील ७७ वे शतक आणि एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील ४७ वे शतक पूर्ण केले. कोहलीने ९४ चेंडूत ९ चौकार आणि तीन षटकारांसह नाबाद १२२ धावा केल्या. यासह त्याने सचिन तेंडुलकरची बरोबरी केली आहे.
सर्वात कमी डावात १३००० धावा पूर्ण करणारा विराट कोहली पहिला फलंदाज ठरला आहे. कोहलीने या बाबतीत सचिन तेंडुलकरला मागे टाकले आहे. त्याने २६७ डावात १३ हजार धावा पूर्ण केल्या. तर सचिन तेंडुलकरने ३२१ डावात १३ हजार धावा पूर्ण केल्या होत्या.
विराट कोहली आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरशिवाय रिकी पाँटिंग, सनथ जयसूर्या आणि कुमार संगकारा यांनीही वनडेमध्ये १३ हजार धावा पूर्ण केल्या. ऑस्ट्रेलियन फलंदाज पाँटिंगने आपल्या ३४१व्या डावात हा विक्रम केला होता. कुमार संगकाराने आपल्या ३६३व्या डावात ही कामगिरी केली होती. तर सनथ जयसूर्याने ४१६ व्या डावात ही कामगिरी केली होती.
विराटने आतापर्यंत २७८ एकदिवसीय सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने ५७.६२ च्या सरासरीने १३०२४ धावा केल्या आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याची सर्वोच्च धावसंख्या १८३ धावा आहे. ४७ शतकांसह त्याने ६५ अर्धशतकेही केली आहेत.
न्यूज अनकट प्रतिनिधी : सूरज गायकवाड