सोलापूर : बाहेर फिरायला गेल्यानंतर मसाला दूध पिल्याने एका महिलेला विषबाधा झाली. आणि त्यातच तिचा मृत्यू झाला असल्याचा प्रकार समोर आला आहे.
हा प्रकार बुधवारी (दि.२०)रोजी सकाळी घडला. भावना राजशेखर किणगी (वय ४०) असे मृत्यू पावलेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी संशय व्यक्त करीत विवाहितेच्या वडिलांनी याची सखोल चौकशी करण्याची मागणी जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात केली आहे.
याबाबत पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, भावना किणगी ही पती राजशेखर किणगी यांच्यासोबत मंगळवारी सायंकाळच्या सुमारास बाहेर फिरायला गेली होती.
दरम्यान, दोघांनी एका ठिकाणी मसाला दूध पिऊन घरी आले. घरी आल्यानंतर भावना किणगी हिला अचानक त्रास होण्यास सुरूवात झाली. त्यामुळे पती राजशेखर किणगी यांनी भावनाला रात्री १०.३० वाजता एका खाजगी रुग्णालयात ऍडमिट केले.
डॉक्टरांनी तपासल्यानंतर भावनाला अन्नातून विषबाधा झाली असल्याचे सांगितले. रात्री भावना शुद्धीवर आली, ती भाऊ गुरू शांतय्या हिरेमठ याला बोलली. पहाटे ५ वाजता गुरूशांत हिरेमठ हा सुनीलनगर येथील घरी आंघोळीसाठी गेला होता. मात्र ७.४५ वाजता दवाखान्यातून बहीण भावना हीचे निधन झाल्याचे फोन आला. गुरूशांतय्या यांनी हॉस्पिटलमध्ये जाऊन पाहणी केली़ त्यांनी तत्काळ द्यावतंगी (ता. आळंद, जि. कलबुर्गी) येथील आपल्या आई-वडिलांना याची माहिती दिली. अधिक तपास पोलीस करीत आहेत.