बिहार विधानसभेच्या तिसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान सुरु

पटरा, ७ नोव्हेंबर २०२० : बिहार विधानसभेच्या तिसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान सुरु असून निवडणूक आयोगानं जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार सकाळी ११ वाजेपर्यंत १९.७४ टक्के मतदान झालं आहे. मतदान शांततेत आणि सुरळीत सुरु असून सर्वत्र चोख सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. विल्मिकीनगर लोकसभेसाठी होत असलेल्या पोटनिवडणुकीत ७.३३ मतदान झालं आहे. १५ जिल्ह्यातील ७८ मतदारसंघांमध्ये मतदान होत आहे. सकाळी सात ते संध्याकाळी सहा या वेळेत मतदान होणार असून नक्षलग्रस्त भागात मतदानाची वेळ संध्याकाळी चार वाजेपर्यंत आहे.

लोक भयमुक्त वातावरणात आणि उत्साहानं मतदान करीत असून यावेळी मतदानाची टक्केवारी जास्त असेल असा विश्वास मुख्य निवडणूक अधिकारी एच. आर. श्रीनिवास यांनी व्यक्त केला.

दरम्यान, मतदानाच्या दुसऱ्या टप्प्यात समावेश असलेल्या हिल्सा मतदारसंघातल्या तीन मतदान केंद्रांवरही आज फेरमतदान होत आहे. या तीन केंद्रांवरील निवडणूक अधिकारी आणि मतदान यंत्रे घेऊन जाणाऱ्या गाडीला ३ नोव्हेंबरला अपघात झाल्यानं मतदान पुढे ढकलण्यात आलं होतं. नागालँडमधल्या दोन मतदान केंद्रावरही आज फेरमतदान होत आहे.

दरम्यान मणीपूरमधल्या चार विधानसभा मतदारसंघातही आज पोटनिवडणूक होत आहे. सकाळी सात वाजता मतदानाला सुरुवात झाली असून संध्याकाळी पाच वाजेपर्यंत मतदान होईल. निवडणूक आयोगानं पाच जागांसाठी पोटनिवडणूक जाहीर केली होती. त्यातील सिंघट मतदारसंघात भाजपाच्या उमेदवाराची बिनविरोध निवड झाली आहे. एक लाख ३५ हजारांहून अधिक मतदार ११ उमेदवारांचं भवितव्य निश्चित करणार आहेत. २०३ मतदान केंद्रांवर कडक सुरक्षा व्यवस्थेत मतदान सुरु आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा