पुणे, १६ जानेवारी २०२३ : स्टार अभिनेते रितेश देशमुख दिग्दर्शित आणि जेनिलिया देशमुखची प्रमुख भूमिका असलेला ‘वेड’ हा चित्रपट प्रचंड चर्चेत आहे. मागील महिन्यात ता. ३० डिसेंबर २०२२ला तो सर्वत्र प्रदर्शित झाला. या चित्रपटाने सध्या प्रेक्षकांना वेड लावले आहे. पहिल्या दिवसापासूनच प्रेक्षकांनी या चित्रपटाला डोक्यावर घेतलेले आहे. या चित्रपटाला मोठे यश मिळताना दिसत असून, आता सर्वांत जास्त कमाई करणारा ‘सैराट’पाठोपाठ ‘वेड’ दुसरा चित्रपट ठरला आहे.
‘वेड’ चित्रपटाने रिलीजच्या काही दिवसांतच नवे विक्रम प्रस्थापित करायला सुरवात केली. एकाच दिवशी सर्वाधिक कमाई करणारा मराठी चित्रपट हा ‘सैराट’च्या नावे असलेला विक्रम ‘वेड’ने मोडला, तर रितेश देशमुख यांचा सर्वाधिक कमाई करणारा मराठी चित्रपट ‘लय भारी’चा रेकॉर्डही ‘वेड’ने मोडला. आता या चित्रपटाने सर्वांत जास्त कमाई करणाऱ्या मराठी चित्रपटांच्या यादीत दुसरे स्थान पटकाविले आहे.
चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी दिलेल्या अहवालानुसार ‘वेड’ हा सर्वांत जास्त कमाई करणाऱ्या मराठी चित्रपटांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे, तर या यादीत पहिला क्रमांक ‘सैराट’चाच आहे. या चित्रपटाने शुक्रवारी (ता. १३) १.३५ कोटींची कमाई केली, तर शनिवारी (ता. १४) ‘वेड’ची कमाई २.७२ कोटी आहे, तर या चित्रपटाने शुक्रवार आणि शनिवारच्या तुलनेत रविवारी आणखी जास्त कमाई केली आहे. शनिवारपर्यंत या चित्रपटाने एकूण ४४.९२ कोटींचा गल्ला जमविला.
या चित्रपटातून रितेशने दिग्दर्शनात पदार्पण केले, तर त्यांच्या पत्नी जिनिलिया देशमुख यांनी मराठी मनोरंजन सृष्टीत पाऊल टाकले आहे. या चित्रपटाची कथा, कलाकारांचा अभिनय, त्यातील संवाद, गाणी हे सर्वच प्रेक्षकांच्या चांगलेच पसंतीस पडले आहे. त्यामुळे लवकरच हा चित्रपट ५० कोटींचा आकडा पार करेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. ‘वेड’ प्रदर्शित होऊन १५ दिवस उलटून गेले, तरी या चित्रपटाची क्रेझ कमी झालेली नाही. रोज चित्रपटगृहामध्ये तुफान गर्दी होत आहे. त्यामुळे चित्रपटाचा गल्लाही चांगलाच जमत आहे.
पन्नास कोटींच्या क्लबमध्ये होणार सहभाग
‘वेड’ चित्रपटाने प्रेक्षकांना चांगलेच वेड लावले असून, चित्रपट रसिकांनी चित्रपटगृहांत तुफान गर्दी केली आहे. गेल्या १५ दिवसांपासून चित्रपटगृह हाऊसफूल्ल गर्दी होत आहे. त्यामुळे या चित्रपटाची कमाई ५० कोटींच्या आसपास गेली आहे. त्यामुळे लवकरच हा चित्रपट ५० कोटींच्या क्लबमध्ये सहभागी होणार आहे, असे सांगितले जात आहे.
‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सतीश पाटील