गोल पोस्ट स्पॉटलाइट सिनेमा ‘वेड’चं तिसरं गाण रिलीज; भाईजान आणि रितेशभाऊचा अफलातून डान्स

‘वेड’चं तिसरं गाण रिलीज; भाईजान आणि रितेशभाऊचा अफलातून डान्स

मुंबई, २१ डिसेंबर २०२२ : रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख यांची मुख्य भूमिका असलेला ‘वेड’ हा मराठी सिनेमा येत्या ३० डिसेंबरला रिलीज होत आहे. या सिनेमाच्या प्रसिद्धीसाठी रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख वेगवेगळ्या ‘रिॲलिटी शो’मधून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. सर्वच प्रेक्षक या चित्रपटाकडे डोळे लावून बसले आहेत. तूर्तास ‘वेड’ या चित्रपटातील एक गाणं रिलीज झालं असून, रितेश आणि भाईजान या गाण्यात धम्माल डान्स करताना दिसत आहेत.

याआधी ‘वेड’ चित्रपटातील ‘वेड तुझा’ आणि ‘बेसुरी’ ही गाणी प्रेक्षकांनी ऐकली. प्रेक्षकांकडून या गाण्यांना भरपूर प्रेम मिळालं. आता दोन यशस्वी गाण्यांनंतर सिनेमातील तिसरं गाणं ‘वेड लावलंय’ रिलीज झालं आहे. अर्थातच संपूर्ण महाराष्ट्राला आपल्या गाण्यांच्या तालावर नाचवणाऱ्या अजय-अतुल या गाजलेल्या जोडीने ‘वेड’ सिनेमातील गाणी संगीतबद्ध केली आहेत. रितेश आणि सलमानची जुगलबंदी प्रेक्षकांना नेहमीच हवीहवीशी असते. त्यामुळे या गाण्याने सोशल मीडियावर नुसता धुमाकूळ घातला आहे. याआधी देखील रितेशच्या ‘लय भारी’ चित्रपटामधून सलमान प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. तेव्हाप्रमाणेच आताही सलमान आणि रितेशची केमिस्ट्री प्रेक्षकांना पसंतीस पडेल.

‘वेड लावलंय’ हे गाणं अजय गोगावले आणि प्रसिद्ध गायक विशाल ददलानी यांनी गायिलं आहे. तर या चित्रपटाचे वैशिष्ट्य म्हणजे, या चित्रपटामधून रितेशची पत्नी आणि अभिनेत्री जेनेलिया देशमुख मराठी सिनेसृष्टीत पाऊल ठेवत आहे. त्याचप्रमाणे ‘वेड’ चित्रपटाद्वारे रितेश दिग्दर्शक क्षेत्रात पदार्पण करीत आहे. आणि आता त्यात भर म्हणून बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खानदेखील त्यांच्या स्वॅगसह या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : ऋतुजा पंढरपुरे

error: Content is protected !!
Exit mobile version