बिहार, २३ ऑक्टोबर २०२०: बिहार निवडणुकीसाठी जाहीर करण्यात आलेल्या व्हिजन डॉक्युमेंटमध्ये, जेव्हा भाजपने मोफत कोरोना लस देण्याचे आश्वासन दिले तेव्हा सर्वच राजकीय पक्षांनी यावर आक्षेप घ्यायला सुरुवात केली. आता हा वाद निवडणूक आयोगापर्यंत पोहोचला आहे. या आश्वासनाविरोधात काँग्रेस पक्षाच्या अनेक नेत्यांनी आवाज उठविला असून निवडणूक आयोगाला अर्थमंत्र्यांविरूद्ध कारवाई करण्याची विनंती केली आहे.
काँग्रेसचे माजी अध्यक्ष व वायनाड खासदार राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटमध्ये या वक्तव्याची खिल्ली उडविली असून त्यास चुकीचे निवडणूक आश्वासन म्हंटले आहे. माजी केंद्रीय मंत्री शशी थरूर यांनी निवडणूक आयोगाला विनंती केली आहे की, भाजपने आपल्या निवडणूक प्रचारात जे आश्वासन दिले आहे ते अवैध असून अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्यावर कारवाई करण्यात यावी.
राहुल गांधी यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी बिहारला कोविड लस मोफत देण्याच्या आश्वासनावरुन मोदी सरकारवर हल्ला केला आहे. वायनाडचे खासदार राहुल गांधी यांनी ट्वीट केले की, “भारत सरकारने कोविड लसीचे वितरण जाहीर केले आहे. कृपया लसी व खोटी आश्वासने कधी मिळतील हे जाणून घेण्यासाठी आपल्या राज्यातील निवडणूक तारीख तपासा.”
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री शशी थरूर यांनीही भाजपच्या या आश्वासनावर तीव्र भाष्य केले. सुभाषचंद्र बोस यांच्या प्रसिद्ध घोषणेच्या आधारावर थरूर यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, “तुम्ही मला मतदान करा, मी तुम्हाला लस देतो …” थरूर पुढे म्हणाले, “किती भयावह राजकीय कुटिलता आहे, निवडणुकीसाठी कोणत्याही पातळीला जाणाऱ्या भाजप पक्षावर निवडणूक आयोग काही कारवाई करणार आहे का ?”
याशिवाय काँग्रेस पक्षाचे निवडणूक प्रचार प्रभारी रणदीप सुरजेवाला यांनी पाटण्यातील पत्रकारांना उद्देशून नि: शुल्क लस देण्याचे आश्वासन बिहारच्या जनतेचा अपमान असल्याचे म्हटले. सुरजेवाला म्हणाले, “मोदींनी नुकतेच राष्ट्राला संबोधित करताना भारतातील लोकांना सांगितले की लसी देण्यास अजून एक वर्ष लागेल, परंतु बिहारमधील त्यांचे नेते आम्हाला फसवण्याचा प्रयत्न करीत आहेत, सर्वांना ठाऊक आहे. बिहारमध्ये साथीच्या वेळी काय घडले, ज्यात एक हजाराहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. ”
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे