सत्ता हवी, पण काम नको, हे चालणार नाही – अजित पवार संतापले

मुंबई, २६ मार्च २०२३: राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातील कामकाजाबद्दल विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार संतापले असून, तुम्हाला सत्ता हवी पण काम नको, असं चालणार नाही, अशा शब्दांत त्यांनी सरकारला खडसावलंय. अधिवेशन संपल्यानंतर पत्रकार परिषदेत त्यांनी सरकारच्या कामकाजावर बोट ठेवलं. ते म्हणाले, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्र्यांची सभागृहातील उपस्थिती अगदी नगण्य होती.

मंत्री उपस्थित नसल्यानं प्रश्न लक्षवेधी राखून ठेवण्याची वेळ अध्यक्षांवर अनेकदा आली. मंत्र्यांनी दिलेल्या माहितीत त्रुटी राहिल्याने माहिती सुधारुन घेण्याचे निर्देश अध्यक्षांना द्यावे लागले. माझ्या कारकिर्दीतलं अशाप्रकारचं हे पहिलं अधिवेशन असेल. अधिवेशनाबद्दल सरकारची एकप्रकारे अनास्था, बेफिकीरी जाणवली, अशी टीकाही पवारांनी केलीय.

तुम्हाला मंत्री व्हायचं आहे. सरकारी गाडी, बंगला, सिक्युरिटी पाहिजे: पण, काम करायचं नाही, हे चालणार नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णय यायचा तेव्हा येईल. परंतु जोपर्यंत सत्तेत आहात, तोपर्यंत तरी काम करा. असे बोल त्यांनी सत्ताधाऱ्यांना सुनावले. तसेच विधीमंडळात आमदारांकडून जनतेचे प्रश्न मांडले जातात. परंतु सरकार याकडं गांभीर्याने बघणार नसेल, तर जनताच यांना गांभीर्याने घेईल, असा इशाराही विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी यावेळी दिला.

न्यूज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा