‘आधी केलेले पाप धुवून काढा, मगच आशीर्वाद मागा’, भाजपच्या जन आशीर्वाद यात्रेला राष्ट्रवादीचा टोला

ठाणे, २० ऑगस्ट २०२१: गेल्या काही महिन्यांपासून पेट्रोल आणि डिझेलचे भाव गगनाला भिडत आहेत. काही ठिकाणी तर पेट्रोल ने शंभरी पार केली आहे. इतकेच नाही तर घरगुती गॅसच्या किमती मध्ये देखील सातत्याने वाढ होताना दिसली. नुकतीच घरगुती गॅस मध्ये २५ रुपयांची वाढ झाली आहे. एकीकडे राज्यभर महागाईचं असं वातावरण असताना भाजपकडून जन आशीर्वाद यात्रा काढली जात आहे. यावर खोचक टीका करत राष्ट्रवादी काँग्रेसने ठाणे शहरातील पेट्रोल पंपावर ठीक ठिकाणी पोस्टर्स लावले आहेत. आधी केलेले पाप धुवून काढा, मगच आशीर्वाद मागा, असा मजकूर असलेले अनेक फ्लेक्स राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने ठाणे शहरातील विविध पेट्रोल पंपांच्या बाहेर लावले आहेत.

राष्ट्रवादीच्या होर्डिंग्जवर नेमकं काय लिहिलं?

ठाणे शहरातील सर्वच पेट्रोल पंपांच्या बाहेर असे होर्डिंग्ज लावण्यात आले आहेत. त्यावर भाजपची जनआशीर्वाद यात्रा, पेट्रोल-डिझेल आणि घरगुती गॅसचे दर गगनाला भिडले, आधी केलेलं पाप धुवून काढा, मगच आशीर्वाद मागा, असा मजकूर छापून इंधनाचे दरपत्रकही छापण्यात आले आहे.

१६ ऑगस्टपासून भाजपच्या नव्या केंद्रीय मंत्र्यांची महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या ठिकाणी जनआशीर्वाद यात्रा सुरु झाली आहे. १६ तारखेला मराठवाड्यात भागवत कराड, ठाणे- कल्याणमधून कपील पाटील तर पालघरमधून भारती पवार यांच्या जनआशीर्वाद यात्रेची सुरुवात झाली आहे. नारायण राणे आज (२० ऑगस्ट)पासून यात्रा सुरू करतील.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा