मंगळावर सापडलं पाणी, जमिनीखाली सापडले पाण्याचे तीन तलाव

वॉशिंग्टन, २९ सप्टेंबर २०२०: मंगळ ग्रह मानवाच्या दृष्टीनं वेगळ्या नजरेनं बघितला जातो. भविष्यात मंगळ ग्रहावर मानव वास्तव्य करू शकतो की नाही यावर सध्या बरंच संशोधन सुरू आहे. अशातच आता अमेरिकन स्पेस एजन्सी ‘नासा’च्या शास्त्रज्ञांना मंगळावर पाण्याचा स्रोत मिळालाय. वैज्ञानिकांना मंगळाच्या पृष्ठभागाखाली पाण्याचे तीन स्त्रोत सापडले आहेत. याआधी देखील दोन वर्षांपूर्वी मंगळाच्या दक्षिण ध्रुवावर एक खाऱ्या पाण्याचा जलाशय देखील आढळला होता. हा जलाशय बर्फानं आच्छादित झालेला होता. याचा अर्थ असा होतो की, भविष्यात आपण मंगळावर जाऊन राहू शकतो. परंतु, या पाण्याचा वापर आपल्याला करता येणं आवश्यक आहे. म्हणजेच हे पाणी पिण्यायोग्य करता येणं महत्त्वाचं आहे.

 

२०१८ मध्ये, युरोपियन स्पेस एजन्सी (ईएसए) च्या स्पेसक्राफ्ट मार्स एक्सप्रेस’नं मंगळाच्या दक्षिण ध्रुवावरील पृष्ठभागाखाली एक खाऱ्या पाण्याचा तलाव असलेलं ठिकाणी शोधलं होतं. २०१२ ते २०१५ या काळात या तलावाचं अस्तित्व निश्चित करण्यासाठी मार्स एक्सप्रेस उपग्रह त्या भागात २९ वेळा गेला. प्रत्येक वेळेस या उपग्रहांनी छायाचित्रे घेतली व त्याचं परीक्षण केलं. त्याच भागाच्या आसपास या उपग्रहाला पुन्हा आणखी तीन तलाव निदर्शनास आले आहेत. या तीन तलावांसाठी २०१२ ते २०१९ दरम्यान या उपग्रहाला १३४ वेळा परीक्षण करावं लागलं.

मंगळाच्या पृष्ठभागावरील पाणी द्रव अवस्थेत दिसून आलं आहे. ‘नेचर अ‍ॅस्ट्रोनॉमी’ या विज्ञान मासिकात हा अहवाल प्रसिद्ध झालाय. २०१८ मध्ये शोधण्यात आलेला हा तलाव मंगळाच्या दक्षिण ध्रुवावर आहे. मात्र, हा तलाव बर्फानं आच्छादलेल्या अवस्थेत आहे. तसंच जवळपास हा तलाव २० किलोमीटर रुंदीचा आहे. मंगळावर संशोधन सुरू झाल्यापासून मानवाला निदर्शनास आलेल्या जलाशयापैकी हा सर्वात मोठा जलाशय आहे.

रोम युनिव्हर्सिटीच्या खगोलशास्त्रज्ञ अलेना पेटीनेली यांनी सांगितलं की, “दोन वर्षांपूर्वी सापडलेल्या तलावाच्या भोवती आम्ही आणखी तीन तलाव शोधले आहेत. जे मंगळ ग्रहावर अतिशय दुर्लभ असलेल्या जलसाठ्यांपैकी एक आहेत ज्याचा आम्ही अद्याप अभ्यास करत आहोत.” पूर्वीच्या संशोधनात मंगळाच्या पृष्ठभागावर द्रव पाण्याची संभाव्य चिन्हे आढळली होती.

यापूर्वी असं समजलं जात होतं की, मंगळ हा पाणी नसलेला व डोंगराळ ग्रह आहे. परंतु, आता या संशोधनातून हा समज दूर झालाय. विशिष्ट परिस्थितीत, द्रव स्थितीत मंगळावर पाणी सापडलं आहे. शास्त्रज्ञांचं असं मत होतं की, बऱ्याच काळापूर्वी मंगळ ग्रहावर पृथ्वीप्रमाणेच विपुल प्रमाणात पाणी होतं. परंतु, तीन अब्ज वर्षांपूर्वी मंगळ ग्रहाच्या हवामानात झालेल्या मोठ्या बदलामुळं हे पाणी संपुष्टात आलं असावं.

ऑस्ट्रेलियामधील स्विनबर्न विद्यापीठाचे सहाय्यक प्राध्यापक एलन डफी यांनी याला एक मोठी उपलब्धी असल्याचं वर्णन केलं आणि सांगितलं की, “या पाण्याच्या शोधामुळं मंगळावर जीवन निर्माण होण्याची विपुल संभावना आहे.” यापूर्वी, अमेरिकेच्या अंतराळ संस्था नासा’नं जाहीर केलं होतं की, २०१२ मध्ये मंगळावर दाखल झालेल्या सर्च रोबोट क्युरिओसिटी’ला खडकांमध्ये तीन अब्ज वर्षांपूर्वीचे सेंद्रिय रेणू सापडले आहेत. यावरून असं सूचित होतं की त्या वेळी या ग्रहावर जीवन असावं.

अमेरिकन रोबोट्स रोव्हर क्यूरियोसिटी आणि ईएसए’च्या उपग्रहांनी मंगळावर कोणत्या भागात ओलावा आहे आणि कोणता भाग निर्जल आहे हे शोधणं सोपं केलंय. रोव्हर’नं हे शोधून काढला आहे की, मंगळावरील हवेत विपुल प्रमाणात आर्द्रता आहे. ग्रहाच्या पृष्ठभागाचा शोध घेणाऱ्या रोव्हर्स’ना असंही आढळलं आहे की, मंगळावरील मातीत या आधी लावण्यात आलेल्या अनुमानापेक्षाही जास्त ओलावा आहे.


न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा