बीड जिल्ह्यात तलावाची भिंत फोडून पाणीचोरी .

बीड , दि. २५ एप्रिल २०२०: आष्टी तालुक्‍यातील कडा तलावाच्या भिंतीला मोठमोठी भगदाडे पाडून व शासकीय मालमत्तेचे नुकसान करून कृषी विद्युत पंपाद्वारे शेतीसाठी पाण्याची चोरी होत असल्याचा प्रकार पाटबंधारे विभागाने केलेल्या पाहणीत उघड झाला आहे.
याप्रकरणी अंभोरा पोलिस ठाण्यातील फिर्यादीवरून गुरुवारी (दि.२४) राजी देवीनिमगांव व लिंबोडी येथील १२ शेतकऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आष्टी तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीच्या झळा तीव्र झाल्या आहेत. अनेक गावांमध्ये ग्रामस्थांची पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट सुरू झाली आहे. आगामी काळातील पाणी टंचाई लक्षात घेऊन आष्टी तालुक्यातील कडा मध्यम प्रकल्पातील पाणीसाठा पिण्यासाठी राखीव ठेवण्यात आलेला आहे.

मात्र तरी देखील शेतकऱ्यांकडून शेतीसाठी रात्री-अपरात्री अवैधरित्या चोरून मोठ्या प्रमाणात पाणी उपसा सुरू आहे. याबाबत अनेक तक्रारीही पाटबंधारे विभागास प्राप्त झाल्या आहेत.

पाटबंधारे विभागाचे सहायक अभियंता देवेंद्र लोकरे यांनी अभियांत्रिकी सहायक रामानंद आकसाळ यांच्यासह एम.ए.शेख व जी.एस.वाबळे यांच्यासह कडा मध्यम प्रकल्पाची पाहणी करण्यासाठी गेले असता तेथे चंद्रकांत गजें, दिनकर आंधळे, नवनाथ गर्जे (रा.लिंबोडी), हरिदास रांगोळे, साहेबराव वाळके, मेहरूप पाचे,भगवान पाचे, बाजीराव रांगोळे, उत्तम जठार, महादेव पोकळे, बाबा जठार व इतर एक (रा. देवीनिमगांव) यांनी धरणाच्या भिंतीवर पाईप टाकून व धरणाच्या भिंतीला छिद्र पाडून पिण्यासाठी राखीव ठेवण्यात आलेल्या पाण्याची चोरी करून ते शेतीसाठी वापरत असल्याचे आढळले.

याबाबत अभियांत्रिकी सहायक रामानंद आकसाळ यांनी गुरुवारी अंभोरा पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून या १२ शेतकऱ्यांविरुद्ध शासकीय मालमत्तेचे नुकसान केल्याबद्दल गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा