आमच्यासाठी देश महत्त्वाचा असल्यामुळे आम्ही सर्व एकत्र आलो आहोत, मल्लीकार्जुन खर्गे यांचे वक्तव्य

बंगळुरु, १८ जुलै २०२३ : सत्ताधाऱ्यांच्या विरोधात देशातील २६ विरोधी पक्षांची आज कर्नाटकच्या बंगळुरु येथे बैठक पार पडली. या बैठकीत भाजप विरोधात लढणाऱ्या या नव्या आघाडीचे नाव ठरवण्यात आले. या आघाडीला इंडिया असे नाव देण्यात आले आहे. देशातील २६ विरोधी पक्षांच्या नेत्यांची महत्त्वाची बैठक पार पडल्यानंतर त्यांची संयुक्त पत्रकार परिषद पार पडली. पत्रकार परिषदेत काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी यावेळी या नव्या आघाडीचे इंडिया असे नाव ठेवल्याचे जाहीर केले. यावेळी त्यांनी इंडियाचा अर्थ देखील सांगितला. I म्हणजे इंडियन, N म्हणजे नॅशनल, D म्हणजे डेमोक्रेटिक, I म्हणजे इन्कुसिव्ह, A म्हणजे अलायन्स, असे खर्गे म्हणाले. यावेळी खर्गे यांनी भाजपवर सडकून हल्ला चढवला.

भाजपला देशाची लोकशाही आणि संविधान संपवायचे आहे. ते केंद्रीय तपास यंत्रणांचा यासाठी वापर करत आहेत. विरोधकांना दाबण्यासाठी ते ईडी, सीबीआय सारख्या तपास यंत्रणांचा वापर करत आहेत,अशी टीका मल्लिकार्जुन खर्गे यांनी केली. आपल्यासाठी देश हा महत्त्वाचा आहे. त्यामुळे आम्ही सर्व एकत्र आलो आहोत. आपल्याला देशाला कसे वाचवता येईल यासाठी प्रयत्न करणे हेच आमचे ध्येय आहे. विरोधकांची पुढील बैठक ही मुंबईत होईल, असेही खर्गे यांनी जाहीर केले.

यावेळी इंडिया आघाडीचे नेतृत्व कोण करणार? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर विरोधकांच्या समन्वयासाठी ११ संयोजक बनवण्यात येणार आहेत. मुंबईच्या बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. इंडिया आघाडीचे नेतृत्व कोण करणार याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल. ही फार काही मोठी गोष्ट नाही, असे मल्लिकार्जुन खर्गे यांनी सांगितले.

याआधी पाटण्याला बैठक झाली. त्यावेळी १६ पक्ष बैठकीत होते. परंतु आज २६ पक्ष एकत्र आले आहेत. नरेंद्र मोदी यांनी ३० पक्षांची एनडीए बैठक बोलावली आहे. पण मला माहिती नाही एवढे ३० पक्ष कोणते आहेत. ते रजिस्टर आहेत का? मला माहिती नाही. त्यांच्या एनडीएतून अनेक पक्ष सोडून जात आहेत. त्यांच्या एनडीएचे तुकडे झाले आहेत. आता निवडणुकीच्या आधी मोदी ते तुकडे जोडण्याचे प्रयत्न करत आहेत, असे खर्गे म्हणाले.
आमचे ध्येय हे प्रत्येक महत्त्वाचे विषय एकामागेएक घेण्याचे आहे. आम्ही आपापसातले सर्व मतभेद दूर सारुन लोकशाही वाचवण्यासाठी एकत्र आलो आहोत. आम्ही आगामी निवडणुकीला एकत्रितपणे सामोरे जाणार आहोत. मी सर्वांचे आभार मानतो, असे खर्गे म्हणाले.

न्युज अनकट प्रतिनिधी : अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा