तीन महिन्यानंतर भरला वाल्हेचा आठवडे बाजार

पुरंदर, दि.९ जून २०२० : राज्य शासनाने आठवडे बाजार सुरू करण्याची परवानगी दिल्यानंतर पुरंदर तालुक्यातील वाल्हे येथील आठवडे बाजार आज भरवण्यात आला होता. मात्र हा बाजार नेहमीच्या ठिकाणी न भरता पालखी मार्गालगतच्या गावामध्ये येणाऱ्या मार्गावर भरविण्यात आला होता. बाजारातील गर्दी टाळण्यासाठी ग्रामपंचायत व पोलिस प्रशासनाच्यावतीने हा निर्णय घेण्यात आला.

आठवडे बाजार भरण्यापूर्वी वल्हे ग्रामपंचायतीच्या वतीने संरक्षणात्मक उपाय योजना करण्यात आल्या होत्या. जंतूनाशक औषधांची फवारणी करुन बाजारतळाचे निर्जंतुकीकरण करण्यात आले. तसेच बाजारात येणाऱ्या ग्राहकांना हात धुण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्यात आली होती.

यावेळी सरपंच अमोल खवले म्हणाले की , तब्बल तीन महिन्यांनंतर शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न केला जात आहे. आजच्या या बाजारामध्ये फक्त वाल्हे येथील शेतकऱ्यांना व व्यापाऱ्यांना भाजीपाला व जीवनाश्यक वस्तू विक्रीस परवानगी देण्यात आली असून वाल्हेच्या बाहेरील परगावाहून या बाजारासाठी नियमीत येणाऱ्या व्यापाऱ्यांना मात्र कोरोनाच्या पार्श्वभुमीवर परवानगी नाकारण्यात आली आहे.

मात्र भविष्यात कोरोनाच्या आजाराची व्याप्ती कमी झाल्यानंतर वाल्हेचा आठवडे बाजार गावातील मुळ बाजारपेठेत पुर्ववत भरवला जाऊन त्यामध्ये बाहेरुन येणाऱ्या व्यापाऱ्यांनाही परवानगी दिली जाईल.यावेळी हनुमंत पवार, पोलिस औटपोस्टचे बी.व्हि.जगदाळे, समीर हिरगुडे, ग्रामविकास अधिकारी बबन चखाले आदि उपस्थित होते.

न्युज अनकट प्रतिनिधी: राहूल शिंदे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा