लोणी काळभोर, ३१ डिसेंबर २०२०: महाराष्ट्र सरकारने करोना विषाणूचा धोका लक्षात घेऊन नववर्षाच्या पार्श्वभूमीवर आधीच रात्री ११ ते सकाळी ६ या वेळेत पालिका क्षेत्रांत संचारबंदी लागू केलेली आहे.
राज्यात ग्रामीण क्षेत्रांत येत्या ५ जानेवारीपर्यंत रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आलेली असतानाच आता ३१ डिसेंबरसाठी राज्य सरकारकडून महत्त्वाच्या गाइडलाइन्स जारी करण्यात आल्या आहेत. करोनाच्या अनुषंगाने यात नागरिकांना अनेक सूचना करण्यात आल्या असून ३१ डिसेंबर रोजी दिवसा संचारबंदी नसेल असे देखील स्पष्ट करण्यात आले आहे.
अन्य सण व उत्सवांप्रमाणे नववर्षाचे स्वागतही यंदा साधेपणाने केले जावे, कुठेही गर्दी करून सोशल डिस्टन्सिंगचा नियम मोडला जाऊ नये, यासाठीच या विशेष गाइडलाइन्स करण्यात आल्या आहेत.
सरत्या वर्षाला निरोप देतानाच नव्या वर्षाचे स्वागत उत्साहात आणि जल्लोषात करण्याची परंपराच चालू झाली आहे. मात्र, करोनाचा प्रादुर्भाव आणि करोना विषाणूचा वाढलेला धोका लक्षात घेऊन राज्य सरकारने नागरिकांच्या उत्साहाला थोडीशी वेसण घातली आहे.
३१ डिसेंबर रोजी दिवसभर संचारबंदी नसली तरी सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी व नववर्षाचे स्वागत करण्याच्या निमित्ताने नागरिकांनी घराबाहेर पडू नये असे आव्हान लोणी काळभोर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरज बंडगर यांनी सांगितले आहे.
नववर्षाचे स्वागत घरीच साधेपणाने करावे, असे गाइडलाइन्समध्ये नमूद करण्यात आले आहे.
१. नागरिकांनी ३१ डिसेंबर व १ जानेवारी रोजी घराबाहेर न पडता नववर्षाचे स्वागत घरीच साधेपणाने करावे.
२. ३१ डिसेंबरच्या दिवशी नागरिकांनी समुद्र किनारे, बागा, रस्ते अशा सार्वजनिक ठिकाणी मोठ्या संख्येने गर्दी न करता सोशल डिस्टन्सिंग राहील तसेच मास्क व सॅनिटायझरचा वापर होईल याकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे.
३. विशेषत: राज्यातील ग्रामीण भागातील अनेक ठिकाणी नागरिकांची गर्दी होत असते. त्या दृष्टीने करोनाचा प्रादुर्भाव पाहता नागरिकांनी आरोग्याच्या दृष्टीने काळजी घेणे आवश्यक आहे.
४. करोनाच्या पार्श्वभूमीवर ६० वर्षांवरील नागरिकांनी व दहा वर्षांखालील मुलांनी सुरक्षिततेच्या व आरोग्याच्या दृष्टीने शक्यतो घराबाहेर जाणे टाळावे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ज्ञानेश्वर शिंदे