मुंबई, ५ नोव्हेंबर २०२०: रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना काल सकाळी रायगड पोलिसांनी अटक केली. २०१८ मध्ये इंटिरियर डिझानयर अन्वेय नाईक यांच्या आत्महत्या प्रकरणात अर्णब गोस्वामींवर कारवाई करण्यात आली आहे. अर्णव गोस्वामी यांच्यावर करण्यात आलेल्या कारवाईवरून भाजप कडून मोठ्या प्रमाणावर विरोध होताना दिसत आहे. राज्य सरकारनं आणि मुंबई पोलिसांनी सूड उगवण्यासाठी अर्णव गोस्वामी वर ही कारवाई केली असल्याचं भाजप नेत्यांकडून म्हटलं जात आहे. या अटकेच्या कारवाईची तुलना भाजपाकडून १९७५ च्या आणीबाणी केली जात आहे. त्यातच आता भाजपाचे नेते तेजिंदरपाल सिंह बग्गा यांनी चक्क दिल्लीतील महाराष्ट्र सदनाबाहेर राज्यात आणीबाणी २.० लागल्याचा दावा करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचं पोस्टर लावलं आहे.
सुप्रिया सुळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळं देशात आणीबाणीची स्थिती निर्माण झाली आहे असा आरोप केला होता. याला प्रत्युत्तर देत भाजपचे नेते अतुल भातखळकर म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळं देशात आणीबाणी असल्याचं सुप्रिया सुळे काल म्हणाल्या. ही आणीबाणी खरेतर राज्यात उद्धव ठाकरे यांच्या सूडबुद्धी कारभारामुळे सुरू आहे. अर्णब गोस्वामींना झालेली अटक ही लोकशाहीला काळिमा फासणारी घटना आहे. यापुढं भकास आघाडीने लोकशाहीच्या गप्पा मारू नये. धिक्कार या शब्दात त्यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.
अर्णव गोस्वामी यांना अटक करण्यात आल्यानंतर भाजपच्या अनेक नेत्यांकडून प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली. या प्रकरणावरून भाजप नेते आशिष शेलार यांनी देखील राज्य सरकारवर टीका केली. पत्रकार राहुल कुलकर्णी आणि माजी नेव्ही अधिकारी या दोन प्रकरणांवरून त्यांनी राज्य सरकारवर टीका केली. ते म्हणाले, एका प्रकरणात राज्य सरकारला उघडे पाडले म्हणून पत्रकार राहुल कुलकर्णीला अटक केली, सरकार विरोधात सोशल मिडियावर बोलणाऱ्या निवृत्त नेव्ही अधिकाऱ्यांसह सामान्य माणसाला ठेचून काढणं नित्याचंच झालं. आता सरकारला खडा सवाल विचारणाऱ्या संपादकाच्या हातात बेड्या… वा रे वा लोकशाही सरकार! काँग्रेसच्या सहवासात बिघडले ठाकरे सरकार.. हाच का तुमचा लोकशाही कारभार? दुर्दैवानं, लोकशाहीचा आजचा काळा दिवस. महाराष्ट्र आणीबाणीच्या दिशेनं?
त्याचसोबत केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनीही या कारवाईचा निषेध केला आहे. जावडेकर यांनी ट्विट करत म्हटलंय की, मुंबईमध्ये पत्रकारितेवर जो हल्ला झाला तो निंदनीय आहे, आणीबाणीसारखी महाराष्ट्र सरकारची ही कारवाई आहे. आम्ही याचा निषेध करतो असं त्यांनी सांगितलं आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे











































.jpeg?updatedAt=1710923538190)
