औरंगाबाद, २७ जानेवारी २०२३ : भगवान गौतम बुद्धांची पवित्र अस्थिकलश पदयात्रा औरंगाबाद शहरात दाखल झाली. ही पदायात्रा परभणी ते चैत्यभूमी दादर अशी मार्गक्रमण करणार आहे. ता. १७ जानेवारीला परभणीहून चैत्यभूमी दादर, मुंबईकडे निघालेल्या धम्म पदयात्रेचा आज ११ वा दिवस असून, २०० किलोमीटर चालण्याचा टप्पा पूर्ण झाला आहे.
परभणीतून पदयात्रा आज औरंगाबाद येथे दाखल झाली असता हजारो बौद्ध उपासक, उपासिकांनी अस्थिकलशाच्या दर्शनासाठी जालना रोडवरील दूध डेअरी परिसरामध्ये मोठ्या संख्येने हजेरी लावली होती; तसेच कार्यक्रमामध्ये उपासक, उपासिकांनी सामुदायिक वंदना घेतली.
भगवान बुद्धांच्या पवित्र अस्थिकलश पदयात्रेत थायलंड येथील ११० भिक्खू सहभागी झाले आहेत. अशा ऐतिहासिक भव्य धम्म पदयात्रेचे औरंगाबाद शहरात जोरदार स्वागत करण्यात आले. पुढे पदयात्रा नाशिकमार्गे चैत्यभूमी दादरकडे मार्गक्रमण करणार आहे.
‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : विनोद धनले