पर्यटन, धार्मिकस्थळी गर्दी, सर्वत्र रोषणाई, आतिषबाजी
पुणे, १ जानेवारी २०२३ : ३१ डिसेंबर २०२२ च्या मध्यरात्री घड्याळाच्या काट्याने १२ चा आकडा गाठताच जम्मू-काश्मीर ते कन्याकुमारी आणि महाराष्ट्र ते पश्चिम बंगाल संपूर्ण देशभरात भारतीयांनी अभूतपूर्व जल्लोषात, फटाक्यांच्या आतषबाजीत नवीन वर्षाचे स्वागत केले. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी पर्यटनस्थळे, धार्मिक स्थळांवर नागरिकांनी गर्दी केली होती.
मुंबई, पुणे, दिल्ली, मनाली, गोवा, कोलकाता, चेन्नईसह देशभरातील सर्वच शहरांत नागरिकांनी २०२२ ला निरोप देत २०२३ चे मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात स्वागत केले. मुंबईत ठिकठिकाणी लोक रस्त्यांवर जमले होते. रात्री १२ वाजता मरीन ड्राईव्हवर आतिषबाजी केली. यानिमित्ताने अनेकांनी पर्यटनस्थळाला हजेरी लावली. लोणावळा, खंडाळा, माथेरान, कोकण, गोवा, मनाली, हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मीर यासह विविध पर्यटनस्थळांवर गर्दी उसळली होती. तीन वर्षांनंतर कोरोनाचा जोर ओसरला. त्यामुळे नागरिक नववर्षाच्या स्वागतासाठी घराबाहेर पडले. त्यामुळे पर्यटनस्थळी गर्दी पाहायला मिळाली.
मंदिरांमध्ये गर्दी
२०२२ वर्षाच्या अखेरच्या दिवशी अनेकांनी मंदिरात जाणे पसंत केले. तुळजापूर, शिर्डी, पंढरपूर, कोल्हापूर यासह राज्यातील सर्वच मंदिरांत गर्दी झाली होती. देवाचे दर्शन घेत अनेकांनी २०२२ वर्षाला निरोप दिला आणि जल्लोषात नववर्षाचे स्वागत केले. राजधानी दिल्लीतही इंडिया गेटसमोरही मोठी गर्दी जमली होती.
मंदिरांमध्ये गर्दी
२०२२ वर्षाच्या अखेरच्या दिवशी अनेकांनी मंदिरात जाणे पसंत केले. तुळजापूर, शिर्डी, पंढरपूर, कोल्हापूर यासह राज्यातील सर्वच मंदिरांत गर्दी झाली होती. देवाचे दर्शन घेत अनेकांनी २०२२ वर्षाला निरोप दिला आणि जल्लोषात नववर्षाचे स्वागत केले. राजधानी दिल्लीतही इंडिया गेटसमोरही मोठी गर्दी जमली होती.
सर्वप्रथम ऑकलंड येथे नववर्षाचे स्वागत
जगभरात नववर्षाचे स्वागत जल्लोषात केले जाते. यानिमित्ताने सेलिब्रेशनही होते. जगात सर्वप्रथम न्यूझीलंडमधील ऑकलंड येथे नववर्षाचे स्वागत करण्यात आले. येथील नागरिकांनी शुक्रवारी मध्यरात्रीच १२ च्या ठोक्याला २०२३ चे फटाक्यांची आतषबाजी करून स्वागत केले. यावेळी नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. यानिमित्ताने हॉटेल्स, पर्यटनस्थळे, धार्मिक स्थळे सजविण्यात आली होती. ऑस्ट्रेलिया, दुबईतही फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली; तसेच रोषणाईने आसमंत उजळून निघाला होता.
गोव्यात डीजे नाईट
गोव्यात नववर्षाचे जल्लोषात स्वागत पाहायला मिळालं. २०२३ च्या स्वागतासाठी गोव्यात लाखो पर्यटक पोचले. क्लब, पब आणि नाइट पार्ट्यांमध्ये मोठ्या संख्येने गर्दी झाली होती.
मुंबईत बंदोबस्त
कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी मुंबईत कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. संपूर्ण मुंबईत संध्याकाळपासूनच १०० ठिकाणी नाकाबंदी लावून वाहनधारकांवर नजर ठेवली होती. त्यासाठी मुंबईत २२०० वाहतूक पोलिस तैनात केले होते. मुंबईकरांना थर्टी फर्स्ट आणि नवीन वर्षाचे स्वागत आणि जल्लोष साजरा करताना वाहतुकीचे नियम पाळण्याचे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले होते. मद्यपी आणि भरधाव वेगात वाहने चालविणाऱ्यांविरोधात कारवाईचा बडगा उगारण्यात आला.
‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सतीश पाटील