नवा सामना पण चिन्हाचं काय?

मुंबई, ३ ऑक्टोंबर २०२२ : एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राज्यात सत्ता संघर्ष होऊन शिंदे यांनी शिवसेनेचे असंख्य आमदार फोडत शिवसेनेसोबत बंड करून मुख्यमंत्री झाले आणि ठाकरे महाविकास आघाडीला पहिला दणका दिला, त्यानंतर शिवसेना आमचीच असा दावा करत त्यांनी हे धकातंत्र सुरूच ठेवले खरी शिवसेना कोणती’ यावरुन वाद सुरु असताना धनुष्यबाण चिन्ह कोणाला मिळणार याकडेही सर्वांचं लक्ष आहे. पक्षचिन्हावरुन सध्या शिंदे गट आणि उद्धव ठाकरे आमने-सामने असतानाच अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूकही जाहीर करण्यात आली आहे.

दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर राज्यातील विधानसभेची ही पहिली निवडणूक आहे. मुंबईतील अंधेरी पूर्व येथील शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांच्या निधनानंतर निवडणूक आयोगाने पोटनिवडणूक जाहीर केली आहे. ६ राज्यातील ७ जागासाठी पोटनिवडणुका पार पडणार असून ३ नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. तर ६ नोव्हेंबर रोजी मतमोजणी पार पडणार आहे. या पोटनिवडणुकीसाठी राज्यात शिवेसेनेच्या पक्षचिन्ह आणि नावावरून शिंदे गटासमोर नवा पेच निर्माण झाला आहे.

सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाला खरी शिवसेना कोण याबाबत निर्णय घेण्यास सांगितलं आहे. शिवसेना कुणाची आणि पक्षचिन्ह कुणाचं हा वाद निवडणूक आयोगाकडे असताना आता या निवडणुकांत शिंदे गटाला आणि ठाकरे गटाला उमेदवार देता येईल का? दिले तर चिन्ह आणि पक्षाचं काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे या निवडणुकांत शिवसेनेच्या दोन्ही गटांच्या भूमिकेकडे लक्ष लागलेले आहे.

शिवसेना-भाजप युती २०१९ मध्ये असताना ही जागा शिवसेनेच्या वाट्याला गेल्याने भाजपाचे माजी नगरसेवक मुरजी पटेल यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढविली होती. लटके यांनी त्यांचा १६९६५ मतांनी पराभव केला, तरी ४५८०८ मते मिळवून ते दुसऱ्या स्थानी होते. लटके यांची मुख्यमंत्री शिंदे यांच्याशी चांगली मैत्री होती. त्यामुळे शिवसेनेची ही जागा शिंदे गटाला मिळायला पाहिजे असे काही नेत्यांना वाटत आहे. तर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी लटके यांच्या पत्नी ऋतुजा यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला आहे, तर अंधेरी पोटनिवणुकीत शिंदे गट आणि उद्धव ठाकरे आमने-सामने असल्यास ते कोणत्या चिन्हावर निवडणूक लढणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी – वैभव शिरकुंडे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा