डिजिटल चलनाचे तुमच्यासाठी काय फायदे? क्रिप्टो आणि डिजिटल रुपया यांच्यात काय फरक, घ्या जाणून

पुणे, 3 फेब्रुवारी 2022: अर्थसंकल्प 2022: अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी अर्थसंकल्पादरम्यान अनेक मोठ्या घोषणा केल्या. यामध्ये डिजिटल करन्सीबाबत मोठी घोषणा करण्यात आलीय. अर्थसंकल्पीय भाषणादरम्यान, अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी डिजिटल चलनाबद्दल म्हणजेच ‘डिजिटल रुपया’बद्दल बोललं. अर्थमंत्र्यांनी सांगितलं की, आरबीआयचं डिजिटल चलन 2022-2023 या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला लाँच केलं जाईल. यावर आरबीआयकडून काम सुरू आहे. डिजिटल अर्थव्यवस्थेच्या क्षेत्रात हे एक क्रांतिकारी पाऊल ठरेल, असा सरकारचा विश्वास आहे. पण हे डिजिटल चलन काय आहे? ते कसं वापरलं जाईल? याबाबत सर्वसामान्यांच्या मनात अनेक प्रश्न आहेत. डिजिटल चलन आणि त्याचे फायदे 8 मुद्द्यांमध्ये समजून घ्या.

अशी असते डिजिटल करन्सी, असा होतो वापर

1 – डिजिटल चलनाचं पूर्ण रूप सेंट्रल बँक डिजिटल चलन आहे
2 – हे रिझर्व्ह बँकेने जारी केलं आहे, त्याला सरकारची मान्यता मिळते.
3 – हे मध्यवर्ती बँकेच्या बॅलन्स शीट मध्ये देखील समाविष्ट आहे
4 – या चलनाचं वैशिष्ट्य म्हणजे ते देशाच्या सॉवरेन करन्सीत रूपांतरित केलं जाऊ शकतं.
5 – भारताच्या बाबतीत तुम्ही याला डिजिटल रुपया म्हणू शकता
6 – डिजिटल चलनाचे दोन प्रकार आहेत – रिटेल आणि होलसेल
7 – रिटेल डिजिटल चलन सामान्य लोक आणि कंपन्या वापरतात
8- आर्थिक संस्थांमार्फत होलसेल डिजिटल करन्सी वापरली जाते

नवीन आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला डिजिटल करन्सी होईल लाँच

अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी सांगितलं की, ब्लॉकचेन तंत्रज्ञान आणि इतर तंत्रज्ञानाचा वापर करून डिजिटल चलन सुरू केलं जाईल. यामुळं डिजिटल अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळणार आहे. यामुळं चलन व्यवस्थापन अधिक कार्यक्षम आणि कमी खर्चिक होईल. त्या म्हणाल्या की, ‘डिजिटल रुपया’ हे डिजिटल चलन नवीन आर्थिक वर्षाच्या सुरुवातीलाच लाँच केलं जाईल.

डिजिटल चलनाचे फायदे काय आहेत

  • हे कमी खर्चिक आहे. व्यवहारही वेगाने होऊ शकतात.
  • डिजिटल चलनाच्या तुलनेत चलनी नोटांची छपाई आणि व्यवहार खर्च जास्त आहे
  • डिजिटल चलनासाठी एखाद्या व्यक्तीला बँक खात्याची आवश्यकता नाही, ते ऑफलाइन देखील असू शकतं
  • डिजिटल चलनावर सरकारची नजर राहणार आहे. डिजिटल चलनाचा मागोवा घेणे शक्य होईल, जे रोखीने शक्य नाही
  • डिजिटल रुपया किती आणि कधी जारी करायचा हे रिझर्व्ह बँकेच्या हातात असंल.
  • बाजारातील रुपयाची अधिकता किंवा तुटवडा व्यवस्थापित करता येईल.

डिजिटल आणि क्रिप्टो चलनात काय फरक

1- डिजिटल चलन ज्या देशाची केंद्रीय बँक जारी करते त्या देशाच्या सरकारद्वारे मान्यताप्राप्त आहे.

2 – क्रिप्टोकरन्सी ही एक विनामूल्य डिजिटल मालमत्ता आहे, ती कोणत्याही देशाच्या किंवा प्रदेशाच्या सरकारच्या अधिकारक्षेत्रात किंवा नियंत्रणाखाली नाही

3 – बिटकॉइन सारखी क्रिप्टोकरन्सी विकेंद्रित आहे आणि ती कोणत्याही सरकार किंवा सरकारी संस्थेशी संलग्न नाही

कायद्यात सुधारणा करण्याचा आरबीआयने दिला प्रस्ताव

देशातील डिजिटल चलनही नोटेच्या व्याख्येत ठेवावे, असा रिझर्व्ह बँकेचा प्रस्ताव आहे. म्हणजेच डिजीटल चलनही ‘बँक नोट’ सारखे पाहिले पाहिजे. यासाठी आरबीआयने कायद्यात सुधारणा करण्याचा प्रस्ताव दिला आहे. मध्यस्थांना सेंट्रल बँकेचं डिजिटल चलन हस्तांतरित करणं आवश्यक असेल.

डिजिटल रुपयाद्वारे सर्व पेमेंट शक्य

मार्चपासून सुरू होणाऱ्या नवीन आर्थिक वर्षात खरेदीसाठी पर्समध्ये कागदी नोटा घेऊन बाजारात जाण्याची गरज भासणार नाही. कारण तुम्ही डिजिटल चलनाद्वारे सर्व प्रकारची पेमेंट करू शकता.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा