मुंबई २२ जून २०२३:कालच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबियांच्या सुरक्षेत, राज्यामधील सत्ताधारी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस सरकारने कपात केली. आतापर्यंत ठाकरे कुटुंबियांना ‘झेड प्लस’ दर्जाची सुरक्षा पुरवली जायची, पण आता त्यांना ‘वाय’ दर्जाची सुरक्षा पुरवली जाणारय. सामान्य लोकांमधील खुप जणांच्या मनात प्रश्न निर्माण होत असेल की, ‘झेड-प्लस’ ‘झेड’ ‘वाय’ आणि ‘एक्स सिक्युरिटी’ म्हणजे काय? ह्या सिक्युरिटी काय आहेत, हेच आज आपण जाणून घेणार आहोत.
‘झेड-प्लस’ ‘झेड’ ‘वाय’ आणि ‘एक्स सिक्युरिटी’ हे शासनाकडुन भारतातील प्रमुख व्यक्तींना दिले जाणारे, काही महत्वाच्या सुरक्षेचे प्रकार आहेत. हया सुविधा देशातील कुठल्याही सर्वसामान्य नागरिकाला दिल्या जात नाहीत.
‘झेड-प्लस सिक्युरिटी’- ‘झेड-प्लस’ ही सर्वोच्च सुरक्षा श्रेणी मानली जाते. या सिक्युरिटी टीममध्ये ५५ सुरक्षा कर्मचारी आहेत. यात एक पोलिस अधिकाऱ्यासह, दहापेक्षा जास्त एनएसजी कमांडो (नॅशनल सिक्युरिटी गार्ड) असतात. ही सुरक्षा मुख्यतः केंद्र सरकारचे मंत्री, राज्यांचे मुख्यमंत्री, सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयांचे न्यायाधीश, प्रसिद्ध राजकारणी आणि बडे नोकरशहा यांना पुरवली जाते. ज्यांना दहशतवादी हल्ल्याचा धोका असतो अशा लोकांनाही ही सुरक्षा दिली जाते. पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष अमित शहा, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ अशा व्यक्ती या यादीत सामील आहेत.
‘झेड सिक्युरिटी’- झेड सिक्युरिटी ही दुसऱ्या क्रमांकाची सुरक्षा श्रेणी मानली जाते. यामध्ये चार ते पाच एनएसजी जवानांबरोबरच (नॅशनल सिक्युरिटी गार्ड) एकूण २२ सुरक्षागार्ड असतात. ही सुरक्षा राज्यातील मंत्री, माजी मुख्यमंत्री यांना पुरवली जाते. योग गुरू रामदेव आणि सिने अभिनेता आमिर खान अशा व्यक्ती या यादीत सामील आहेत.
‘वाय सिक्युरिटी’- वाय ही तिसऱ्या क्रमांकाची सुरक्षा श्रेणी मानली जाते. यांमध्ये एक ते दोन कमांडो आणि पोलिस कर्मचाऱ्यांसह ११ जवान असतात. त्यामध्ये दोन पीएसओ (पर्सनल सिक्युरिटी ऑफिसर) देखील असतात. भारतामध्ये बऱ्याच महत्वाच्या व्यक्तींना ही सुरक्षा प्रदान केली गेली आहे.
‘एक्स सिक्युरिटी’- एक्स ही चौथ्या क्रमांकाची सुरक्षा श्रेणी मानली जाते. यात केवळ दोन जवानांचा समावेश असतो. यापैकी एक पीएसओ म्हणजे पर्सनल सिक्युरिटी ऑफिसर्स असतो. खासदार, आमदार, नगरसेवक आणि विविध राजकीय पक्षांच्या लोकप्रतिनिधींना, ही सुरक्षा प्रदान केली गेली आहे.
‘एसपीजी सिक्युरिटी’- एसपीजी म्हणजे स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप. एसपीजी ची सुरक्षा देशातील अतीविशेष लोकांना दिली जाते, ज्यात भारताचे पंतप्रधान देखील असतात. या आधी ही सुरक्षा राजीव गांधी यांच्या हत्येनंतर १९९१ मध्ये, राहुल गांधी, प्रियंका गांधी, सोनिया गांधी यांना देण्यात आली होती. नुकतीच तीन वर्षाआधी ही सुरक्षा त्यांच्याकडुन काढुन घेतली गेली. एसपीजी कमांडोंकडे ‘एफएनजी २ हजार असॉल्ट’ सारखी रायफल असते, ती ऑटोमॅटिक गन आहे. ग्लोक १७ नावाची अत्याधुनिक पिस्तुलंही त्यांच्याकडे असते.
देशात आणि राज्यात कोणाला सुरक्षा द्यायची हे ठरवताना, वेळोवेळी अतिमहत्त्वाच्या व्यक्ती आणि त्यांच्या सुरक्षेचा आढावा घेतला जातो. हा रिपोर्ट तज्ज्ञांच्या समितीला दिला जातो, त्यानंतर सुरक्षा द्यायची, ती वाढवायची किंवा कमी करायची याबद्दलचा निर्णय सरकारकडून घेतला जातो.
न्युज अनकट प्रतिनिधी- आचल सुर्यवंशी