पक्षीविश्व- गव्हाणी घुबड (Barn Owl)

गव्हाणी घुबड हा मानवी वस्तीजवळ जुन्या पडक्या घरामध्ये, झाडांच्या ढोलीमध्ये वास्तव्य करतो. अलीकडील काळामध्ये शहरीकरणामुळे वाढलेल्या सिमेंटच्या जंगलामध्येसुद्धा या घुबडाने आपले अस्तित्व कायम ठेवले व वापरात नसलेल्या इमारतीच्या खिडक्यांमध्ये आपले बस्तान बनवले.

घुबडाच्या बहुतांश जाती या निशाचर असतात. गव्हाणी घुबडसुद्धा निशाचर असून संध्याकाळ झाली की शिकारीच्या शोधात बाहेर पडतात. यांचा आवाज हा भयानक किंचाळीसारखा असतो. जगभरात या गव्हाणी घुबडाच्या सुमारे वीस उपजाती आढळतात. त्यापकी दोन उपजाती भारतीय उपखंडात आहेत. भारतीय उपखंडामध्ये यांचा वावर हा भारताबरोबर पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंका व म्यानमार येथेही आहे. गव्हाणी घुबडाचे शास्त्रीय नाव हे ‘टायटो आल्बा’ असे आहे. ग्रीक भाषेमध्ये टायटो म्हणजे घुबड व आल्बा म्हणजे पांढऱ्या रंगाशी निगडीत.

गव्हाणी घुबड साधारणत: कावळ्याच्या आकाराचे असते. शरीराच्या वरील भागावर सोनेरी, तपकिरी रंग असतो. पोटाचा भाग पांढरा असून अंगावर काळे-पांढरे ठिपके असतात. शरीराच्या मानाने शेपटीचा आकार खूप लहान असतो. डोके हे मोठ्या आकाराचे असते व चेहऱ्याला गडद रंगाची कडा असते. चोच आकाराने लहान पण अत्यंत तीक्ष्ण असते. चोचीला लागूनच नाकपुड्या असतात. पाय पंजापर्यंत पांढऱ्या पिसांनी आच्छादलेले असतात. नर व मादी दोन्ही दिसायला सारखेच असतात.

यांचे मुख्य अन्न हे उंदीर असून क्वचित साप, पाली, सशाची पिल्ले व खारीवरसुद्धा उदरनिर्वाह करतात. जमिनीपासून थोड्या उंच जागेवर बसून ते आपल्या शिकारीची वाट बघतात, शिकार टप्प्यात आली की लगेच त्यावर झडप घालतात. घुबडांच्या अंगावर असलेल्या लहान पिसांच्या आच्छादनामुळे उडताना इतर पक्ष्यांच्या मानाने त्यांच्या पंखांचा बिलकुल आवाज होत नाही. भक्ष्य पकडताना याचा त्यांना खूप फायदा होतो. कधीकधी सकाळ होण्याच्या सुमाराला घुबड रस्ता चुकून वस्तीमध्ये उघड्यावर येऊन बसते. दिवसा त्यांना कमी दिसत असल्यामुळे ते एका जागी शांत बसून राहतात. कधीतरी कावळेसुद्धा त्यांना त्रास देतात. आसरा शोधत कधी ते आपल्या घरात किंवा खिडकीत येतात. संध्याकाळ झाली की ते पुन्हा आपल्या नियोजित स्थळी पोचतात.

घुबडाचे दर्शन हे अशुभ असते, असे आपण सर्वच जुन्या लोकांकडून ऐकत आलो आहोत. पण खरंच असे असते का? आपण कधी यामागचे सत्य जाणून घेण्याचा प्रयत्न केला का? पूर्वीच्या काळी जाणकार लोकांना खूप चांगली दूरदृष्टी होती. अंधश्रद्धेच्या माध्यमातून का होईना त्यांनी निसर्गातील महत्त्वाच्या घटकांचे संरक्षण व संवर्धन करण्याचा प्रयत्न केला. याचेच अत्यंत महत्त्वाचे उदाहरण म्हणजे घुबड. शेतीला व अन्नधान्याला नुकसान पोचवणाऱ्या उंदरांवर नियंत्रण ठेवण्याचे काम घुबड करते म्हणून त्याला अशुभ संबोधण्यात आले, जेणेकरून त्या पक्ष्याचे गावातील वास्तव्य कायम राहील व शिकाऱ्यापासून घुबडाला संरक्षण मिळेल.

अलीकडच्या काळामध्ये जादूटोणा व तत्सम कारणांसाठी घुबडांची खूप मोठ्या प्रमाणावर तस्करी होते. त्याचबरोबर हॅरी पॉटरसारखे चित्रपट बघून अनेकांना घुबड पाळण्याचा मोह होतो. भारतामध्ये अनेक ठिकाणी घुबडे पकडून त्यांना रंगवून त्यांची अवैध विक्री केली जाते. भारतातील सर्वच पक्षी हे वन्यजीव संरक्षण कायदा १९७२ नुसार संरक्षित आहेत व त्यांना पकडणे, मारणे, विकणे हे बेकायदा आहे. अनेक अवैध व्यापाऱ्यांना कडक शिक्षा झाली आहे. त्यामुळे लक्ष्मीचे वाहन असलेल्या व निसर्गातील महत्त्वाचा घटक असलेल्या घुबडांचे संरक्षण करणे, हे आपले कर्तव्य समजून, सुजाण नागरिक म्हणून निसर्गाच्या संवर्धनास मदत केली पाहिजे.

न्युज अनकट प्रतिनिधी- गुरुराज पोरे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा