तुमचा मुलगा काय करतो?

पुणे, २४ सप्टेंबर, २०२२ : दृश्यम चित्रपटात एका मोठ्या पोलिस ऑफिसरचा मुलगा तरुण मुलींच्या अंघोळीचा व्हिडिओ तयार करतो. तिला ब्लॅकमेल करतो. अशा पद्धतीचे वर्तन सध्या मुलांमध्ये दिसू लागले आहे. हे झाले चित्रपटातले. त्यानंतर चंदीगड विद्यापिठात पन्नास मुलींच्या अंघोळीचा व्हिडिओ व्हायरल झाला. यावरुन तरुण पिढी किती वाया जात आहे, हे जाणवतं आहे.

प्रत्येकाला आपल्या अपत्याची काळजी वाटत असते. त्यातून मुलगा म्हणजे वंशाचा दिवा हे समीकरण अनेक काळापासून प्रचलित आहे. पण सध्या जरी हे समीकरण बदलत असलं तरी अजूनही मुलांनाच प्राधान्य आहे. त्याचेच परिणाम आता दिसू लागले आहेत. ज्यामध्ये मुलांच्या वर्तनाकडे पालकांचे दुर्लक्ष होते.
जेव्हा मुलं तरुण वयात येतात, त्याचवेळेला त्यांच्याआधीच त्यांच्याकडे मोबाईल आलेला असतो. तंत्रज्ञानाच्या बाबतीत तो पालकांच्या दोन पावलं पुढे असतो. त्यामुळे त्याच्यावर पालकांचा धाक असाही कमी झालेला असतो. त्यामुळे आता पालकांच्या हातातून मुलं जातात का? असा प्रश्न पडत आहे. यासाठी पालकांनी विशेष खबरदारी घेणं गरजेचं आहे.

१. पालकांचे मुलांकडे विशेष लक्ष असणं गरजेचं आहे. त्यासाठी आठवड्यातून एकदा मुलांबरोबर गप्पा मारा. ज्यात इतर विषयांवर चर्चा करा. ज्यामुळे पालक मुलांना जवळचे वाटतील.

२. मुलांना त्यांच्या अडचणी विचारा. त्या सोडवण्यासाठी तुम्ही प्रयत्न करा.

३. मुलांचे मित्र-मैत्रिणी यांचे नंबर जवळ ठेवा. काही प्रॉब्लेम आल्यास ते पालकांकडे असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर त्यांचे मित्र चांगल्या संस्कारातले किंवा वळणाचे आहेत का नाही? हे पाहून घ्यावे.

४. सध्याचे जग हे आधुनिकतेचे असल्यामुळे मुलांच्या मित्रांमध्ये मुलींचा समावेश असतो. त्यामुळे मुलं मर्यादा ओलांडत नाही ना? याकडे लक्ष ठेवा.

५. पालकांनीदेखील मुलांशी बोलताना त्याच्याकडून कुठल्याही गुन्हा सदृश्य गोष्टी मुलांकडून घडत नाही ना? यावर लक्ष ठेवणं गरजेचं आहे.

६. महिन्यातनं एकदा मुलांबरोबर आऊटिंगला जावं, जेणे करुन मुलांबरोबरचा बॉन्ड विकसीत होण्यास नक्कीच मदत होईल.

७. मुलांना कामाला कायम प्रोत्साहन द्या. त्यातून त्यांना पालक बरोबर असल्याची जाणीव होईल.

८. मुलांना अनपेक्षितपणे कधीतरी गिफ्ट द्या. जेणेकरुन मुलं खुश होतील आणि पालकं आपल्याबरोबर असल्याची त्यांना जाणीव होईल.

९. जर मुलगा विचित्र मार्गावर, व्यसनाच्या मार्गावर जात असतील तर त्यांना समुपदेशन करण्याची आणि करवून घेण्याची पालकांची जबाबदारी आहे.

१०. तसेच मुलांना सत्य परिस्थितीची जाणीव करुन पूर्ण न करता येणारे अमिष न दाखवणे हे पालकांचे कर्तव्य आहे.
या सर्व गोष्टी पालकांकडून पाळल्या गेल्यास तुमचा मुलगा काय करतो? हा प्रश्नच उद्भवणार नाही.

न्यूज अनकट प्रतिनिधी- तृप्ती पारसनीस

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा