चंद्रकांतदादा मराठा आहेत, याची काय व्हॅलेडिटी?

पुणे, १३ ऑक्टोंबर २०२२ : भाजप नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांचा उल्लेख असणारी कथित ऑडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. त्यामध्ये भाजप नेते आणि उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मराठा आंदोलनात फूट पाडण्याचा प्रयत्न केल्याचा दावा करण्यात आला आहे. दोन व्यक्तींमधील अर्ध्या तासाच हे संभाषण व्हायरल होत असून त्यामध्ये चंद्रकांत पाटील यांनी मराठा क्रांती मोर्चातील नेत्यांना पैसे देऊन फोडल्याचा आरोप करण्यात आला आहे.

तर चंद्रकांत पाटील यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. आम्हीच मराठा समाजाला आरक्षण दिलं आहे. मग फूट पाडण्याचा प्रश्न येतोच कुठे? असा प्रश्नही चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला आहे. तर, दुसरीकडे मराठा क्रांती मोर्चाने हा मुद्दा लावून धरत चंद्रकांत पाटील यांची मराठा आरक्षण समितीच्या अध्यक्षपदावरून हकालपट्टी करण्याची मागणी केली आहे. चंद्रकांतदादा मराठा आहेत याची काय व्हॅलेडिटी आहे? असा प्रश्नही मराठा क्रांती मोर्चाने उपस्थित केला आहे.

मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक योगेश केदार यांनी हा सवाल केला आहे. त्या ऑडिओ क्लिपमधील माहिती समाजाच्या दृष्टीने अत्यंत गंभीर गोष्ट आहे. समाजाला हरवण्याची ताकद कुण्या ऐऱ्यागैऱ्या सदावर्तेंमध्येही नव्हती. पण आमचेच काही लोक फुटीर निघाले आणि सरकारने काही लोकांना फोडलं म्हणून मराठा समाजाला त्यावेळी आरक्षण नाही मिळालं. काही जणांनी आम्हाला टेबलावर हरवलं, असं योगेश केदार यांनी सांगितलं.

चंद्रकांत पाटलांनी केलेला गुन्हा गंभीर आहे. चंद्रकांत पाटील यांनी तत्काळ राजीनामा द्यावा. त्यांची समितीच्या अध्यक्षपदावरून देखील हकालपट्टी करण्यात यावी. ऑडिओ क्लिप ऐकल्यानंतर जे समोर आले त्यात तथ्य आणि सत्य आहेच. सगळं काही आता समाजाच्या समोर आलं आहे, असेही योगेश केदार म्हणाले आहेत.

तसेच आत्ता चंद्रकांत पाटील यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावल्याचे समोर आले आहे, आणि आम्हीच मराठा समाजाला आरक्षण दिलं आहे. मग फूट पाडण्याचा प्रश्न येतोच कुठे? असा प्रश्नही चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी – वैभव शिरकुंडे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा