कल्याण-डोंबिवली, ६ ऑगस्ट २०२०: काही दिवसांपुर्वी शासनाने कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतून २७ गावांना वगळण्याचा निर्णय घेतला मात्र त्यातील १८ गावं ही वेगळी करून उर्वरित गावांचा महानगरपालिकेत समावेश केला. मात्र त्या नंतर केडीएमसीने १८ गावांमधील १३ नगरसेवकांचे पद रद्द केले होते मात्र अनेक नगरसेवकांनी या निर्णयाला विरोध सुद्धा दर्शविला होता.
आता त्या गावांमध्ये महापालिकेच्या निधीतून सुरू असलेली आणि प्रस्तावित असलेली कामे थांबविण्याचे आदेश आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी विभागप्रमुखांना दिले आहेत. या आदेशामुळे गावांमध्ये सुरू असलेल्या पाणी पुरवठ्याच्या कामांना तसेच रस्ते दुरुस्तीच्या कामांना फटका बसण्याची शक्यता आहे.
त्यात घेसर, हेदुटणे, उंब्रोली, भाल, द्वारली, माणोरे, वसार, आशेळे, नांदिवलीतर्फे अंबरनाथ, आडिवली-ढोकळी, दावडी, चिंचपाडा, पिसवली, गोळीवली, माणगाव, निळजे, सोनारपाडा, कोळे ही गावे आहेत . या गावांमध्ये महापालिका निधीतून सुरू असलेली अथवा प्रस्तावित असलेली कामे थांबविण्यात येत आहेत. या आदेशाची सर्व विभागप्रमुखांनी काटेकोरपणे अंमलबजावणी करावी, असे आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.
मात्र या वेगळ्या केलेल्या गावांच पुढे काय होईल ? हा प्रश्न सगळ्यांना पडला आहे कारण या १८ गावांच्या नगरपरिषदेबाबत कोणत्याही प्रकारची भूमिका अद्याप तरी घेतली नाही. त्यामुळे कोणतीही भूमिका न घेता या १८ गावांमधील कामे ही बंद केल्याने नागरिकांमध्ये संभ्रमाची परिस्थिती निर्माण झाली आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: राजश्री वाघमारे