पुणे, २ सप्टेंबर २०२१: प्रायव्हेसी फोकस इन्स्टंट मेसेजिंग ॲप टेलीग्राम काही काळासाठी भारतात खूप लोकप्रिय झाले आहे. सेन्सर टॉवरनुसार, आता हे ॲप १ अब्ज वेळा डाउनलोड केले गेले आहे. ही आकडेवारी जगभरातील आहे, परंतु भारतीय वापरकर्त्यांची यात महत्त्वाची भूमिका आहे. व्हॉट्सअपच्या विवादास्पद गोपनीयता धोरणानंतर, भारतातील लाखो लोकांनी त्यांच्या स्मार्टफोनवर टेलिग्राम डाउनलोड केले आहेत आणि या ॲपला देखील यामुळे चालना मिळाली आहे.
हे उल्लेखनीय आहे की, टेलिग्रामची सुरुवात २०१३ मध्ये झाली होती आणि आता ती व्हॉट्सॲपला कठोर स्पर्धा देत आहे. सेन्सर टॉवरच्या मते, टेलीग्रामने २७ ऑगस्ट रोजी १ अब्ज डाउनलोडचा टप्पा गाठला आहे. एक अब्जाहून अधिक डाउनलोड केलेल्या ॲप्सच्या यादीबद्दल बोलायचे झाले तर त्यात व्हॉट्सॲप, फेसबुक, मेसेंजर, इन्स्टाग्राम, स्नॅपचॅट, स्पॉटिफाई आणि नेटफ्लिक्सचा समावेश आहे. आता १ अब्ज डाऊनलोडच्या यादीत टेलीग्रामचे नावही जोडले गेले आहे.
सेन्सर टॉवरने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, भारत टेलिग्रामसाठी सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून उदयास आला आहे. कारण एकूण डाऊनलोड च्या २२% फक्त भारतात झाले आहे. याशिवाय, रशिया आणि इंडोनेशिया ही टेलिग्रामची प्रमुख बाजारपेठ आहेत.
हे लक्षात घेण्यासारखे आहे की १ अब्ज डाउनलोड म्हणजे १ अब्ज वापरकर्ते नाहीत. ही फक्त डाउनलोडची संख्या आहे. गेल्या वर्षी टेलिग्रामने म्हटले होते की कंपनीचे ५०० मिलियन मासिक सक्रिय वापरकर्ते आहेत.
२०२०-२१ मध्ये टेलिग्रामला अधिक लोकप्रियता मिळाली. भारतातील लोकांना ते आवडले आणि बऱ्याच लोकांनी ते व्हॉट्सॲप ऐवजी पसंत केले. हेच कारण आहे की कॉलिंग, व्हिडिओ कॉलिंग आणि ग्रुप कॉलिंगला टेलिग्रामवर देखील सपोर्ट देण्यात आले.
भारतात, लोक टेलिग्रामचा वापर केवळ चॅटिंगसाठीच करत नाहीत, तर फाईल्स डाउनलोड करण्यासाठी देखील करतात. कारण तुम्ही व्हॉट्सॲपवर मोठ्या फाईल्स पाठवू शकत नाही, तर इन्स्टाग्रामवर तुम्ही 1 ते 1.5GB पर्यंत फाईल्स सहज पाठवू किंवा प्राप्त करू शकता.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे