पुणे, 7 ऑक्टोंबर 2021: अलीकडेच फेसबुक, इन्स्टाग्राम आणि व्हॉट्ॲपवरची सेवा सहा तासांहून अधिक काळ बंद करण्यात आली होती. यामुळं युजर्स खूप नाराज झाले. आता यासंबंधीचा एक ऑडिओ संदेश व्हॉट्ॲपवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
व्हायरल ऑडिओ संदेशात दावा केला जात आहे की:-
केंद्र सरकारनं दररोज 11:30 ते सकाळी 6:00 पर्यंत व्हॉट्ॲप बंद ठेवण्याचा निर्णय घेतलाय. व्हॉट्ॲपवरील वापरकर्त्यांच्या वाढत्या संख्येमुळं हा निर्णय घेण्यात आलाय. व्हायरल मेसेजमध्ये पुढं असं म्हटलं जात आहे की “जर तुम्ही हा मेसेज किमान 10 लोकांना फॉरवर्ड केला नाही तर 48 तासात तुमचं अकाऊंट अवैध मानलं जाईल आणि ते बंद केलं जाईल. अकाउंट डिलीट केल्यानंतर, 499 रुपये दर महिन्याला व्हॉट्ॲप चालवण्यासाठी शुल्क आकारले जाईल. ते विनामूल्य ठेवण्यासाठी, ते किमान 10 लोकांना फॉरवर्ड करा.”
आम्ही तुम्हाला सांगू की, व्हायरल ऑडिओ मेसेजमध्ये केलेला हा दावा पूर्णपणे चुकीचा आहे. व्हॉट्ॲपबाबत सरकारकडून असा कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही.
हा प्रकार दोन वर्षांपूर्वीही व्हायरल होत होता. अलीकडील व्हॉट्ॲप आउटेजनंतर हा मेसेज पुन्हा पुन्हा व्हायरल होत आहे. व्हॉट्ॲप बंद झाल्यामुळं, वापरकर्ते हे मेसेजिंग प्लॅटफॉर्म सुमारे 6 तास वापरू शकले नाहीत. यामुळं अनेकांना वाटू लागलं की व्हॉट्ॲप बंद झालं आहे.
जेव्हा व्हॉट्ॲप पुन्हा सक्रिय झालं, तेव्हा काही उपद्रवी घटकांनी हा बनावट संदेश पसरवायला सुरुवात केली. कंपनीच्या म्हणण्यानुसार, व्हॉट्ॲप बंद होण्याचं कारण राऊटर कॉन्फिगरेशनमध्ये गडबड होती. यामुळं फेसबुक, इन्स्टाग्राम आणि व्हॉट्ॲप काम करत नव्हते.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे