केंद्र सरकारने भाईगिरी कधीपासून सुरु केली? : नाना पटोले

कल्याण, ८ फेब्रुवरी २०२१: शेतकरी प्रश्नावरून आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा होऊ लागल्यानंतर भारतातील अनेक सेलेब्रिटींनी एकाच हॅशटॅगवर ट्वीट करत शेतकरी आंदोलनावर जागतिक पातळीवर चर्चा करणाऱ्यांना फटकारलं. या मुद्द्यावरून काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. “कलाकार हे एकेकाळी भाई लोकांच्या इशाऱ्यावर चालायचे. केंद्र सरकारच्या दबावाखाली त्यांनी ट्विट केले आहे. केंद्र सरकारने भाईगिरी कधीपासून सुरु केली? हा सवाल आता मोदी सरकारला जनता विचारत आहे. हे चुकीचे आहे”, असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले.
भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री हे रविवारी महाराष्ट्र दौऱ्यावर होते. अमित शहा यांच्या या दौऱ्याच्या निमित्ताने महाराष्ट्रात पुन्हा एकदा भाजपच्या ‘ऑपरेशन लोटस’ची चर्चा सुरू झाली आणि राजकीय तर्क वितर्क लढवले जाऊ लागली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या कोकण दौऱ्यानंतर राज्यातील सत्ता बदलाची चर्चा सुरु आहे. यावर नाना पटोले यांना प्रश्न विचारला असता, “देशात बदल होणार आहे. राज्यात सत्ता बदल होणार नाही. ही सत्ता पाच वर्षे टिकणार असा आम्हाला विश्वास आहे”, असे नाना पटोले म्हणाले.
काल नाना पटोले यांनी कल्याण पूर्वेतील पत्रिपूल परिसरात असलेल्या काँग्रेस पदाधिकारी शाकील खान यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन केले. तसेच कल्याण पूर्वेत नगरसेवक कुणाल पाटील यांच्या नव्या हॉस्पिटलचे उद्घाटन त्यांच्या हस्ते पार पडले. दरम्यान, ‘माझी लढाई जनतेची आहे. सत्तेची आणि खुर्चीची नाही. खुर्ची माझ्या मागे धावते मी खुर्चीच्या नाही. मी जनतेच्या मागे धावतो. काँग्रेसच्या माध्यमातून पूर्वीसारखं वैभव प्राप्त करुन देण्याचा प्रयत्न करणार आहे,’ असा दावा नाना पटोले यांनी यावेळी बोलताना केला.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा