सत्ता असो किंवा नसो, राष्ट्रवादी काँग्रेस नेहमीच शेतकऱ्यांच्या पाठीशी: धनंजय मुंडे

बीड, १९ ऑक्टोंबर २०२०: बीड जिल्ह्याचे पालकमंत्री तसेच राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी काल जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा पावसामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला. जिल्ह्यातील हिरापूर, ईटकूर, मिरकाळा, मादळमोही (ता.गेवराई) येथे रविवारी पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी अतिवृष्टीमुळे बाधित पिकांची पाहणी केली. यावेळी माजी आमदार अमरसिंह पंडित, जिल्हा परिषद सदस्य विजयसिंह पंडित, जिल्हाधिकारी राहूल रेखावार, उपविभागीय अधिकारी नामदेव टिळेकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र निकम उपस्थित होते.

जोरदार पावसाने खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. पीक विम्यासह या नुकसानीची भरपाई देण्यासाठी राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीर उभे राहील, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. पावसाच्या अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या कापूस, सोयाबीन, तूर आदी पिकांची प्रत्यक्ष बांधावर जाऊन त्यांनी पाहणी केली.

भाजपा वर टीका

सत्ता असो किंवा नसो, राष्ट्रवादी काँग्रेस नेहमीच शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिलेली आहे. आम्ही शेतकऱ्यांसाठीच बांधावर आहोत आणि विरोधक मात्र बिहारमध्ये निवडणुकीत व्यस्त आहेत. संकटकाळी शरद पवारच धावून येतात असे स्पष्ट करत सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी भाजपवर टीका केली.

वृद्ध दाम्पत्याशी साधला संवाद

मिरकाळा ता. गेवराई येथे एक वृद्ध दाम्पत्याने झालेल्या नुकसानीची व्यथा मांडताना भावुक झाले, आम्ही चार धाम केले, अनेक वर्ष वाऱ्या करत आहोत, निसर्गाने आमच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून नेला, असे म्हणताच धनंजय मुंडे यांनी, बाबा तुम्ही आता आराम करा, मी तुमचा मुलगा आहे, असं समजा, यापुढे तुमच्यावरची वारी मी करत जाईन, असे म्हणून त्या वृद्ध दाम्पत्याला धीर दिला.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा