उस्मानाबाद, २३ जुलै २०२०: उस्मानाबाद जिल्ह्यातील महिला तलाठी सौ. अर्चना कदम यांना २५ हजाराची लाच घेत असताना एसीबीच्या पथकाने रंगेहात पकडले. संबंधित महिला तलाठी यांनी या प्रकरणातील तक्रारदार यांना त्यांच्या आजोबांच्या नावावर असलेल्या प्लॉटची सातबारा नोंदणी ऑनलाईन करण्याकरिता ते उस्मानाबाद येथील तलाठी कार्यालयात आले असता त्यांना लाच मागितली.
तक्रारदारास ३४ हजार रूपयांची त्यांनी लाच मागितली असता, तडजोड करून तक्रारदाराने संबंधित महिला तलाठी यांना २५००० रुपये देण्याचे ठरले. मात्र, तक्रारदाराने या सर्व प्रकरणाबाबत उस्मानाबादच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधला. तक्रारदाराने दिलेल्या या तक्रारीनुसार, पोलीस निरीक्षक गौरीशंकर पाबळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयाजवळ असलेल्या या तलाठी कार्यालयाच्या भोवती सापळा रचला आणि संबंधित महिला तलाठीला २५००० रूपयांची लाच घेताना रंगेहात पकडले.
महिला तलाठी अर्चना कदम यांच्या विरोधात आनंद नगर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा नोंदविण्यात आला असून, त्यांना उद्या दिनांक २४ जुलै रोजी न्यायालयात उभे करण्यात येणार आहे.
न्यूजअनकट प्रतिनिधी: प्रगती कराड.