लाच स्विकारताना ग्रामसेवकाला रंगेहाथ पकडले

उस्मानाबाद, १० ऑगस्ट २०२०: उस्मानाबाद जिल्ह्यातील सांगवी काटी तालुका तुळजापूर येथील ग्रामसेवकाला ७००० रूपयांची लाच स्विकारताना आज दिनांक १० ऑगस्ट रोजी उस्मानाबाद लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गावातील पंचांसमक्ष रंगेहाथ पकडले.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, सांगवी काटी येथील ग्रामपंचायत कार्यालयात असणाऱ्या शिपाईच्या पदाच्या मंजूरीसाठी तसेच भविष्य निर्वाह निधीचे अकाउंट ऑनलाईन करण्यासाठीचे कागदपत्रे हे पंचायत समिती तुळजापूर येथे पाठविण्याच्या कामासाठी सांगवी काटी येथील ग्रामसेवक विजय नारायण चित्ते यांनी संबंधित शिपायास ७००० रूपयांच्या लाचेची मागणी केली. परंतु, या संबंधित शिपायाची लाच द्यायची तयारी नसल्यामुळे त्याने या प्रकरणाबाबत उस्मानाबाद लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यांच्याकडे तक्रार दिली.

संबंधित शिपायाने दिलेल्या तक्रारीनुसार, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, उस्मानाबादने आज दिनांक १० ऑगस्ट रोजी संबंधित ग्रामसेवक विजय नारायण चित्ते यास सापळा लावून लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले. यावेळी, तेथे पंच देखील उपस्थित होते.या प्रकरणी, पोलीस ठाणे तुळजापूर येथे गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे.

संबंधित प्रकरणातील कार्यवाही ही पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया, अपर पोलीस अधीक्षक डॉ अनिता जमादार ला प्र वि औरंगाबाद व प्रशांत संपते,पोलीस उप अधीक्षक, ला प्र वि उस्मानाबाद यांचे मार्गदर्शनाखाली पो नि गौरीशंकर पाबळे, पो.ह. रवींद्र कठारे,पो. ना. मधुकर जाधव पो. शि. विष्णू बेळे, समाधान पवार,महेश शिंदे व चालक ज्ञानदेव कांबळे या सर्वांनी केलेली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी- प्रगती कराड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा