चंद्रपूरात ड्रग्जचे पार्सल स्वीकारताना, बांधकाम विभागाचा अभियंता एनसीबीच्या जाळ्यात

चंद्रपूर २५ जून २०२३: चंद्रपुरात पोंभुर्णा येथील बांधकाम विभागाच्या अभियंत्याला ड्रग्ज प्रकरणी एनसीबीने अटक केल्याने एकच खळबळ उडाली आहे. एनसीबीच्या पथकाने ड्रग्ज पार्सल घेताना बांधकाम अभियंत्याला रंगेहाथ अटक केली. हेमंत बिचवे वय २९ असे अटक केलेल्या अभियंत्याचे नाव आहे. २.२४ ग्रॅम एलसीडी ड्रग्ज स्वीकारताना अभियंत्याला पकडले. अटक केल्यावर अभियंत्याला पोंभुर्णा न्यायालयासमोर हजर केले असता, त्याला ट्रांसिट डिमांड देण्यात आलीय. अधिक चौकशीसाठी आरोपीला एनसीबीने दिल्लीत नेले. अटक झालेला अभियंता पोंभुर्णा येथील पीडब्लूडीच्या उपविभागीय कार्यालयामध्ये सहाय्यक अभियंता पदावर कार्यरत होता.

नागालँडहून दिल्लीत एक पार्सल आले होते. दिल्ली पोलिसांना या पार्सलमध्ये अंमली पदार्थ असल्याचा संशय आला. पोलिसांनी या पार्सलची पाहणी केली असता यात ड्रग्ज आढळून आले. यानंतर पोलिसांनी पार्सल घेणाऱ्या संबंधित व्यक्तींना अटक केली. त्यांची कसून चौकशी केली असता या ड्रग्जचे धागेदोरे दिल्लीपासून चंद्रपूरपर्यंत असल्याचे निष्पन्न झाले. हे ड्रग्ज कुठे कुठे पाठवण्यात येणार होते याची माहिती आरोपींनी पोलिसांना दिली.

या आधारे दिल्ली पोलिसांनी चंद्रपूर पोलिसांना संपर्क साधून सदर प्रकरणाची माहिती दिली. त्यानुसार चंद्रपूर एनसीबी पथकाने सापळा रचून ड्रग्जचे पार्सल घेताना अभियंत्याला अटक केली. हे ड्र्ग्ज पोस्टाद्वारे चंद्रपूरला पोहचवण्यात आले होते. पोलिसांनी बिचवे याला अटक केल्यावर त्याच्या घरीही छापेमारी केली, या छाप्यात त्याच्या घरी तीन ग्रॅम एमडी ड्रग्ज आणि एलएसडी ड्रग्जची २४ पोस्ट कार्डची तिकिटे आढळून आली. या एका पोस्टकार्ड तिकिटाची किंमत तीन हजार रुपये आहे. या प्रकरणात मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी- अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा