कोण आहेस तू, जी ही सृष्टी निर्माण करते
कोण आहेस तू, जी नवा जीव निर्माण करते
कोण आहेस तू, जी नर-मादी दोघांनाही एकाच योनीतून जन्म देते
कोण आहेस तू, जी नऊ महिने एका जीवाला गर्भात वाढवते
कोण आहेस तू, जी आपल्या दुधानं परवरिश करते एका तानुल्ह्याची
तू एक स्त्री आहेस, तू आहेस निर्माता या मानव जातीची…
तू आई आहेस, तू ताई आहेस,
तू मैत्रीण आहेस, तू प्रेयसी आहेस,
तुझ्याविना कशी चालणार ही सृष्टी…
हे स्त्रीये तू नसती तर राहिली तरी असती का ही मानवजात
निसर्गानं तुलाच दिलंय वरदान, नवा जीव निर्माण करण्याचं
तू नसती तर कोणी चालवलं असतं हे जन्मचक्र
खरंच तू एक स्त्री आहेस, जगतजननी या सृष्टीची…
महामाया म्हणून तूच जन्म दिलास ना बुध्दाला
जिजाऊ म्हणून तूच घडवलं ना शिवाजीला
भिमाई म्हणून तूच घडवले बाबासाहेब
सावित्रबाईं बनून तूच साथ दिली महात्मा जोतिबाला
सगळ्यांना घडवण्यात – वाढवण्यात योगदान तुझंच
पुरुषाच्या बरोबरीनं नाही तर पुरुषाच्याही पुढं पाऊल तुझंच
तू भोळी आहेस, तू प्रेमळ आहेस
तू साधी आहेस, तू सरळ आहेस
पण, जेव्हा कळेल तुला तुझ्यातलं सामर्थ्य
होशील तू पुन्हा राणी झाशीची
होशील तू पुन्हा रझिया सुलतानाची
होशील तू नांगेली त्रावणकोरची
होशील तू फुलनदेवी या समाजाची
तू नेहमीच सिद्ध केलंय स्वतःला कर्तुत्वानं
कधी तू कल्पना बनून अंतराळात गेलीस
कधी तू पी. टी. उषा बनून सुसाट धावलीस
कधी तू लता बनून भारताची कोकिळा झालीस
कधी तू नयनतारा बनून साहित्यिक झालीस
कधी तू इंदिरा बनून प्राईम मिनस्टर झालीस
कधी तू प्रतिभा बनून राष्ट्रपती झालीस
तू सोनिया झालीस, तू जयललिता झालीस
तू ममता झालीस, तू मायावती झालीस,
तू किरण बेदी झालीस, तू मीरा बोरवणकर झालीस
तू सर्वकाही जिंकून घेतलंस तुझ्या जिद्दीनं
पुन्हा एकदा आरशात बघ स्वतःला
किती सुंदर आहेस तू, पण त्याहूनही कशी सामर्थ्यवान आहेस तू…
बघ एकदा तुझ्यातल्या सामर्थ्याला,
बघ एकदा तुझ्यातल्या प्रतिभेला…
एकदा आजमावून बघ तुझ्या ताकदीला,
एकदा सादर कर तुझ्या कलेला
होऊन जाऊदे एकदा या पुरुषसत्ताक व्यवस्थेशी युद्ध
मग कळेल त्या व्यवस्थेलाही काय असतं एका स्त्रीचं बंड
तू लढतेस तुझ्या अस्तित्वाची लढाई
पण तूच नसेल तर राहील का पुरुषाचं तरी अस्तित्व
तुझ्याकडं वाकड्या नजरेनं बघणाऱ्याचे तू डोळेच फोड,
वाईट स्पर्श करणाऱ्याचे तू हातपाय मोड…
तू ठरवलंस तर आत्तापासूनच सुरुवात होईल बदलाची,
तू ठरवलंस तर उद्याच नष्ट होईल सत्ता पुरुषाची…
एकदा फक्त स्वतःला विचार तू कोण आहेस
नेमकं उत्तर मिळेल तू एक पराक्रमी स्त्री आहेस
तुझ्या स्त्रीत्वाला सलाम
तुझ्या कर्तुत्वाला सलाम
तुझ्यातल्या आई पासून आजी पर्यंतच्या सर्व पात्रांना सलाम
तुझ्या त्यागाला सलाम…
विसरू नकोस फक्त, की तू कोण आहेस,
सांग ठणकावून जगाला, मी एक स्त्री आहे
मी एक स्त्री आहे…
.
न्यूज अनकट प्रतिनिधी : अक्षय बैसाणे