मुंबई, 11 जुलै 2022: 11 जुलै ही तारीख शिंदे गट आणि तथाकथित उरलेली शिवसेना यांच्यासाठी महत्वाची ठरणार होती. 11 जुलै अर्थात आज शिंदे गट आणि शिवसेना यांच्यात निकाल लागणार होता. सुप्रिम कोर्टातल्या याचिकेवर आज सुनावणी होणार होती. यात शिंदे गटातील 16 आमदारांवर कारवाई होणार का ? याकडं सगळ्यांचं लक्ष होतं.
मात्र, आज सुप्रिम कोर्टाने शिंदे गटाला दिलासा दिलाय. सध्या आमदारांवर कारवाई नको, असा सुप्रिम कोर्टाने निर्णय दिलाय. त्यामुळे शिंदे गटाला दिलासा मिळाला आहे. आजच्या सुप्रिम कोर्टाच्या कामकाजात शिंदे गटातील आमदारांच्या निलंबनाचा मुद्दाच मांडला गेला नाही. त्यामुळं ही कारवाई लांबणीवर पडली असून त्यामुळं पुन्हा एकदा शिंदे गटाची सरशी झाली आहे, असंच म्हणावं लागेल.
पण, हे होत असताना दुसरीकडं शिवसेना मात्र हवालदिल झालेली पहायला मिळत आहे. शिंदे गटाचं सरकार हे बेकायदेशीर असून, हे बेकायदेशीर सरकार जनतेवर लादलं असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केलाय. अरविंद सावंत यांनीही या आरोपाला पुष्ठी दिली आहे. दुसरीकडं आदित्य ठाकरे यांनी निष्ठा यात्रेतून बंडखोर आमदारांना तुम्ही परत या, आम्ही तुम्हाला क्षमा करु. अन्यथा निवडणुका लढा, असं आवाहन आदित्य ठाकरे यांनी निष्ठा यात्रेतून केलंय.
यावर देवेंद्र फडणवीसांनी आधीच सांगितलं आहे की, संजय राऊत हे फ्रस्टेटेड व्यक्ती असून त्यांना कामधंदे नाहीत. प्रत्येक वेळी उत्तर देण्यासाठी आमच्याकडे तेवढा वेळ नाही, हे स्पष्ट केलं आहे.
आता पुन्हा यानंतर संजय राऊत कदाचित न्यायव्यवस्थेवर टीका -टिपण्णी करतील. आता लोकशाहीवर ताशेरे ओढतील.
पण शेवटी शेरास-सव्वाशेर कोण ठरेल, हे सुप्रिम कोर्टाच्या कारवाई आणि निकालानंतरच ठरेल.
न्यूज अनकट प्रतिनिधी -तृप्ती पारसनीस