शरद पवारांच्या पक्ष उभारण्याच्या व्युहरचनेचा फटका कोणाला? अजित पवार गट की भाजपला

पुणे,२७ जुलै २०२३ : अजित पवार यांनी आमदारांचा एक गट घेऊन राष्ट्रवादीत बंड करत भूकंप घडवला. त्यानंतर अजित पवार यांनी शिंदे सरकारमध्ये सहभागी होऊन उपमुख्यमंत्रीपदाची शपथही घेतली. मधल्या काळात शरद पवार यांनी भाजपसोबत हातमिळवणी करण्यासाठी अजित पवार यांच्या गटाकडून शरद पवार यांची दोन वेळा भेट घेण्यात आली. मात्र, शरद पवार यांनी भाजपसोबत हातमिळवणी करण्यास नकार दिला आहे. पवारांनी पुन्हा ताकदीने उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी त्यांनी राज्यभर दौरेही सुरू केले आहेत. आता अजिदादा आणि भाजपला नामोहरण करण्यासाठी शरद पवार यांनी मोठी व्युव्हरचना केल्याचे सांगितले जात आहे.पवार यांच्या या व्युव्हरचनेचा सर्वाधिक फटका अजित पवार गटाला बसणार की भाजपला हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईल.

राष्ट्रवादीच्या फुटीनंतर शरद पवार कामाला लागले आहेत. त्यासाठी शरद पवार यांनी वेगवेगळ्या मार्गाने तयारी केल्याचे सांगितलं जात आहे. त्यानुसार शरद पवार हे पक्ष बांधणीवर जोर देणार आहेत. त्यासाठी राज्यातील महत्त्वाचे जिल्हे आणि तालुक्यात शरद पवार यांच्या सभा होणार आहेत. या भागातील जनतेशी शरद पवार संवाद साधणार आहेत. त्यातही ज्या भागात राष्ट्रवादीचे वर्चस्व आहे, त्या भागावर शरद पवार सर्वाधिक लक्ष केंद्रित करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. नेते गेले तरी कार्यकर्ते आणि जनता आपल्यासोबत राहील याची काळजी शरद पवार घेणार असल्याचेही सूत्रांनी सांगितले.

शरद पवार यांच्या दुसऱ्या मार्गानुसार ते लवकरच पर्यायी नेतृत्व निर्माण करणार आहेत. ज्या आमदारांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली त्यांच्या मतदारसंघात पर्यायी नेतृत्व उभे केले जाणार आहे. पक्षातील माजी आमदारांना पुन्हा सक्रिय केले जाणार आहे. त्यांना बळ आणि रसद पुरवली जाणार आहे. माजी आमदारांनी निवडणुकीत उतरावे या इराद्यानेच त्यांना तयार केले जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

शरद पवार यांचा तिसरा मार्ग भाजपसाठी घातक ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यानुसार भाजपमधील ज्या माजी आमदारांना सक्रीय राजकारणापासून अडगळीत टाकण्यात आले आहे त्यांना शरद पवार हे आपल्यासोबत घेणार आहेत. या माजी आमदारांना राष्ट्रवादीत घेऊन त्यांना रसद पुरवली जाणार असल्याचे सांगितले जात आहे.

भाजपने माजी आमदारांकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे या आमदारांना राजकारणात पुन्हा सक्रिय व्हायचे आहे. पण भाजपकडे इतर पक्षांच्या नेत्यांचा ओघ वाढल्याने त्यांना सक्रीय सहभागी होता येत नाही. आता या नाराज आणि अस्वस्थ आमदारांवर शरद पवार यांची नजर असून त्यांना आपल्याकडे खेचण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. या माजी आमदारांना फोडण्यात शरद पवार यांना यश आल्यास भाजपची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे.

विद्यमान आमदारांना तोंड देण्यासाठी आणि त्यांना पर्याय देण्यासाठी माजी आमदारांना आपल्याकडे खेचण्याचा शरद पवार यांचा प्रयत्न असल्याचे सूत्रांनी सांगितले. मात्र पवार यांच्या या प्रत्नांना किती यश मिळते हे आगामी काळात पाहावे लागणार आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी : अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा