सर्वात महाग कोण ? धोनीपासून कोहलीपर्यंत रिटेन केलेल्या खेळाडूंना इतके पैसे मिळणार

IPL 2022, Mega Auction Players List, 23 जानेवारी 2022: IPL 2022 च्या मेगा लिलावापूर्वी सर्व 10 संघांची कायम ठेवण्याची यादी उघड झालीय. केएल राहुलला लखनौ फ्रँचायझीने सर्वाधिक 17 कोटी रुपये देऊन करारबद्ध केलं आहे. त्याच वेळी, विराट कोहली, एमएस धोनी आणि रोहित शर्मा यांसारख्या दिग्गज खेळाडूंनाही फ्रँचायझी संघांनी मोठी किंमत देऊन कायम ठेवलंय. चला जाणून घेऊया सर्व 10 संघांच्या कायमस्वरूपी यादीबद्दल-

चेन्नई सुपर किंग्स (CSK):

चार वेळा चॅम्पियन चेन्नई सुपर किंग्सने लिलावापूर्वी चार खेळाडूंना कायम ठेवलंय. रवींद्र जडेजाला सर्वाधिक 16 कोटी रुपयांत कायम ठेवण्यात आलं आहे. तर कर्णधार महेंद्रसिंग धोनी (12 कोटी), मोईन अली (8 कोटी) आणि ऋतुराज गायकवाड (6 कोटी) यांचा उर्वरित तीन खेळाडूंमध्ये समावेश आहे.

  1. मुंबई इंडियन्स (MI):

विक्रमी पाच वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकणाऱ्या मुंबई इंडियन्सने त्यांचा कर्णधार रोहित शर्मा (16 कोटी), वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह (12 कोटी), सूर्यकुमार यादव (8 कोटी) आणि ऑलराउंडर कीरोन पोलार्ड (6 कोटी) याला कायम ठेवण्यात आलंय.

  1. दिल्ली कॅपिटल्स (DC): पहिल्या विजेतेपदाच्या शोधात असलेल्या दिल्लीने ऋषभ पंतला (16 कोटी) पुन्हा एकदा कर्णधार बनवलं आहे. त्याच वेळी, अक्षर पटेल (9 कोटी), पृथ्वी शॉ (7.5 कोटी) आणि दक्षिण आफ्रिकेचा गोलंदाज एनरिक नॉर्टजे (6.5 कोटी) यांनी देखील फ्रँचायझीचा विश्वास जिंकण्यात यश मिळविलं आहे.
  2. पंजाब किंग्स (PBKS): पंजाब किंग्स हा आयपीएलमधील सर्वात खराब संघांपैकी एक आहे. आयपीएल 2022 च्या लिलावापूर्वी पंजाबने सलामीवीर मयंक अग्रवाल (12 कोटी) आणि अनकॅप्ड वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग (4 कोटी) यांना कायम ठेवलंय. केएल राहुल गेल्यानंतर पंजाब किंग्जलाही एका लीडरची गरज आहे.
  3. कोलकाता नाइट रायडर्स (KKR):

दोन वेळचा चॅम्पियन कोलकाताने कॅरेबियन अष्टपैलू खेळाडू आंद्रे रसेल (12 कोटी) यांना सर्वाधिक किंमत देऊन कायम ठेवलंय. त्याचवेळी, मिस्ट्री स्पिनर वरुण चक्रवर्ती (8 कोटी), व्यंकटेश अय्यर (8 कोटी) आणि सुनील नरेन (6 कोटी) यांचाही कायम ठेवलेल्या खेळाडूंमध्ये समावेश आहे. मात्र, मॉर्गनला सोडल्यानंतर कोलकाताही नव्या कर्णधाराच्या शोधात आहे.

  1. राजस्थान रॉयल्स (RR): पहिल्या सत्रात आयपीएलचे विजेतेपद पटकावल्यानंतर राजस्थानच्या कामगिरीत चढ-उतार होत आहेत. आयपीएल 2022 च्या लिलावापूर्वी फ्रँचायझीने कर्णधार संजू सॅमसन (14 कोटी), जोस बटलर (10 कोटी) आणि यशस्वी जैस्वाल (4 कोटी) यांना कायम ठेवलंय.
  2. सनरायझर्स हैदराबाद (SRH):

एकेकाळी आयपीएलचे विजेतेपद पटकावणाऱ्या सनरायझर्ससाठी शेवटचा हंगाम खूप वाईट होता आणि ती शेवटच्या स्थानावर होती. लिलावापूर्वी, फ्रेंचायझीने केन विल्यमसन (14 कोटी), अब्दुल समद (4 कोटी) आणि उमरान मलिक (4 कोटी) यांना कायम ठेवलंय.

  1. रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB):

स्पर्धेतील सर्वात लोकप्रिय संघ RCB अजूनही पहिल्या विजेतेपदाच्या प्रतीक्षेत आहे. फ्रँचायझीने स्टार फलंदाज विराट कोहली (15 कोटी), ग्लेन मॅक्सवेल (11 कोटी) आणि मोहम्मद सिराज (7 कोटी) यांना कायम ठेवण्याचा निर्णय घेतलाय. कोहलीने कर्णधारपद सोडल्यानंतर आरसीबीलाही नव्या कर्णधाराचा शोध घ्यावा लागणार आहे.

  1. लखनौ:

लखनऊ या नवीन फ्रँचायझीने आयपीएल 2022 च्या लिलावापूर्वी तीन खेळाडूंना करारबद्ध केलंय. लखनऊने कर्णधारपदाची जबाबदारी केएल राहुलला (17 कोटी) दिली आहे. त्याच वेळी, मार्कस स्टॉइनिस (9.2 कोटी) आणि रवी बिश्नोई (4 कोटी) देखील संघाशी संबंधित आहेत.

  1. अहमदाबाद:

आणखी एक नवीन फ्रँचायझी अहमदाबादने अष्टपैलू हार्दिक पंड्या (15 कोटी) याला संघाचा कर्णधार म्हणून नियुक्त केलंय. त्याचबरोबर अफगाणिस्तानचा फिरकी गोलंदाज रशीद खान (15 कोटी) आणि सलामीवीर शुभमन गिल (8 कोटी) यांच्यावरही पैशांचा पाऊस पडला आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा